मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे बनवले जात आहेत. एक वेगळा विषय, एक नवखं ठिकाण आणि एक नवा विचार आजच्या पिढीवर आणि समाजावर रुजवायला मनोरंजन हे उत्तम माध्यम. असाच नवखा आणि साधा सरळ संदेश देणारा मराठी सिनेमा म्हणजे ‘झिम्मा.’
कोरोना काळानंतर लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा सिनेमा. या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील तब्बल सात लोकप्रिय अभिनेत्री एकत्र झळकल्या. त्यामुळे या सिनेमाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. तर या सिनेमाचा दुसरा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. काही महिन्यांपासूनच या सिनेमाच्या टीझरची आणि पोस्टरची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती, याचे कारण म्हणजे यामध्ये चाहत्यांच्या दोन लाडक्या अभिनेत्रीच दिसेनात म्हणून.
झिम्मा या सिनेमाच्या पहिल्या भागात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग आणि मृण्मयी गोडबोले या अभिनेत्री झळकल्या होत्या. परंतू या सिनेमाच्या दुसऱ्या भागात सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली आणि लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांची एकदाही झलक न दिसल्याने त्यांचे चहाते मात्र नाराज झाले. त्यामुळे अनेकांनी फक्त त्या दोघींनाच दुसऱ्या भागातून का वगळण्यात आले? असा प्रश्न उपस्थित केला. या सिनेमाच्या पहिल्या भागात सोनाली मैथिली हे पत्र साकारात होती तर मृण्मयी रमा हे पात्र साकारात होती. त्यादोघीही मुख्य भूमिकेतच होत्या, असे असूनही त्या दोघी सिनेमात न दिसण्यामागील खरी बाब या सिनेमाचे दिगदर्शक हेमंत ढोमे यांनी सांगितली.
झिम्मा २ च्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक आणि त्यांची संपूर्ण टीम कायम नवनवीन ठिकाणी होत असलेल्या मुलाखतीमध्ये निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसतात. यादरम्यान दिग्दर्शक हेमंत ढोमे यांना झिम्मा २ मध्ये सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले का नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी खूपच स्पष्टपणे उत्तर देणे पसंत केले. तेव्हा ते म्हणाले की, “पहिल्या भागात मृण्मयी म्हणजेच रमा मुलासाठी प्रयत्न करत होती. मग असं वाटलं की, भाग २ जर प्रेक्षकांना आवडला तर भाग ३ मध्ये तिला मुल झालंय आणि आता पुढे काय? तर सोनालीचं जे पत्र आहे, मैथिली त्याचा शेवट गोड झाला आहे. उगाच त्याला ओढून-ताणून काहीतरी अडचणी आणणं योग्य नाही. त्यामुळे आत्तापुरतं हे पात्र बाजूला ठेवलं आहे.”
या मुलाखती दरम्यान दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी झिम्मा सिनेमाच्या तिसऱ्या भागाचीही हिंट दिली आहे, अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. झिम्मा २ सिनेमासाठी सोनाली आणि मृण्मयी दोघींनी पोस्ट शेअर करत या सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत.