प्रसिद्ध गायक ‘वसंतराव देशपांडे’ यांच्या जीवनावर आधारित मी वसंतराव हा सिनेमा १ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. वसंतराव यांचे बालपण ते ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकापर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवला आहे.
वसंतराव यांच्या जीवनात अनेक चढउतार आले पण तरीही ते कधी डगमगले नाही तर संसार, जबाबदाऱ्या हे सर्व सांभाळत गाण्याची आवड जपताना त्यांची होणारी फरपट या सिनेमामधून दाखवण्यात आली आहे. या सगळ्यात वेळोवेळी मिळालेल्या चांगल्या गुरुंमुळे वसंतरावांच आयुष्य कसे घडत होते, हे सांगणारी ही कथा आहे.
हा सिनेमा अविनाश धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केला असून या सिनेमाच्या प्रमुख भूमिकेत म्हणजेच वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांच्याच नातवाने म्हणजेच सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी केली आहे. त्यांच्या अभिनयामुळे सिनेमात जान आली आहे असे नक्कीच म्हणता येईल.
यंदाच्या ९५ व्या ऑस्करसाठी जाहीर केलेल्या जगभरातील ३०१ चित्रपटांमध्ये ‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटाचा समावेश झाला आहे. या चित्रपटाचे गायक आणि निर्माते राहुल देशपांडे यांना यावेळी खूप आनंद झाला. तेव्हा ते म्हणाले की, “यानिमित्ताने आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. शिवाय मराठी चित्रपट आणि संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचे आहे. ‘मी वसंतराव’ या चित्रपटामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचीच कथा मी एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो आहे. इतकेच नव्हे तर त्यातील गाणी आणि संगीत दिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या या नामांकनाने मला खूप आनंद झाला आहे.”