मालिका क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील “माझी तुझी रेशीमगाठ”. या मालिकेने फारच कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.
या मालिकेची हटके कथा आणि यातील मुख्य जोडी यश – नेहा आणि छोटीशी परी म्हणजेच मायरा प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. यश आणि नेहा या गोड जोडीची भूमिका श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरेने साकारली आणि त्यांच्या प्रेमाची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या रांगेत सगळ्यात पुढे होती. तर काही दिवसांपूर्वी ही मालिका संपणार असं समजताच प्रेक्षक मात्र नाराज झाले, अन् प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका चालू ठेवण्यात आली होती. पण आता मात्र ही मालिका खरोखरच बंद होणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेतील बालकलाकार मायर हिने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करत ही बातमी दिली होती.
नेहा म्हणजेच प्रार्थनाने नुकत्याच केलेल्या पोस्टने या गोष्टीची पुष्टी केली आहे. प्रार्थनाने शूट दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिले की, “शूट चा हा शेवटचा दिवस” त्यामुळे आता माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजत आहे.
यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण चाहतावर्ग भाऊक झाला आहे आणि ही मालिका संपूच नये अशी इच्छा व्यक्त करत आहेत. पण यावेळी मात्र पूर्वीप्रमाणे काहीही होणार नाही हे नक्की. त्यामुळे आता झी मराठीवर कोणती नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.