मागील एक ते दोन वर्षात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत शिवकालीन घटनांवर आधारित सिनेमांची घोडदौड सुरू झाली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील अनेक घटना प्रेक्षकांना सिनेमांतून पाहण्याची संधी मिळत आहे.
तर दुसरीकडे प्रेक्षकवर्गाकडून देखील या सिनेमांना उत्तम प्रतिसाद असल्यामुळे निर्माते देखील प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करताना दिसत आहेत. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते ‘दिग्पाल लांजेकर’ यांनी हीच बाब लक्षात ठेवून ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेची घोषणा केली. यामध्ये ते एकूण आठ सिनेमे बनवणार असून प्रत्येकवेळी इतिहासाच्या सुवर्णपानांमधील दडलेला अध्याय उलगडणार हे नक्की.
शिवराज अष्टक या संकल्पनेतील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ हे चार सिनेमे आत्तापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. तर या सिनेमांच्या घवघवीत यशानंतर या मालिकेतील पाचवा सिनेमा देखील आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी काही महिन्यांपूर्वीच यातील पुढील सिनेमा म्हणजेच ‘सुभेदार‘ची घोषणा केली.
सुभेदार या सिनेमाच्या नावावरूनच हा सिनेमा कोणावर आणि कोणत्या घटनेवर असेल याचा अगदी योग्य अंदाज प्रत्येकानेच बांधला आहे. तर हा सिनेमा सुभेदार तान्हाजी मालुसरे आणि त्यांच्या सिंहगडाच्या चित्तथरारक कथेवर आधारित आहे. त्यामुळे हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार यासाठी प्रेक्षक अगदी उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर आज(२१जून रोजी) या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
यामधे दाखवल्याप्रमाणे सुभेदार या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता ‘चिन्मय मांडलेकर’ तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री ‘मृणाल कुलकर्णी’ दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करीत लिहिले की, “आई भवानीच्या चरणी अर्पण करत आहोत श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’!”
याच कथेवर आधारित असलेला हिंदीमधील ओम राऊत यांचा ‘तान्हाजी’ या सिनेमाला टक्कर द्यायला मराठीतील सुभेदार सिनेमा येत्या २५ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वचजण सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.