२०२१ साली भारतीय सिनेसृष्टीत एका दमदार सिनेमाची भर पडली, तर तो सिनेमा म्हणजे ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise). तेलुगु भाषेतील ॲक्शन आणि थरारपट असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं.
पुष्पा सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंच शिवाय बॉक्स ऑफिसवर देखील प्रचंड कमाई केली. त्यामुळे आता ‘पुष्पा २’ ची सारेच आतुरतेने वाट पाहत आहेत. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा२: द रुल’ या सिनेमाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. सिनेमाची घोषणा होताच चाहत्यांमध्ये खूपच उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. पूर्वीप्रमाणेच या सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे.
दमदार कास्ट घेऊन दिग्दर्शक सुकुमार सध्या पुष्पा २ चे शूटिंग करत आहेत. ५ एप्रिल रोजी रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त तिचा पुष्पा २ मधील लूक तिने चाहत्यांसोबत शेअर केला. त्या पाठोपाठ अल्लू अर्जुनने देखील ८ एप्रिल रोजी त्याचा फर्स्ट लूक सर्वांसोबत शेअर केला. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी पुष्पा २ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. टीझरमधील अल्लू अर्जुनचा लूक पाहून त्याच्यावरून कोणाच्याच नजरा हटत नव्हत्या. अल्लू अर्जुनचा काठा पदराची साडी नेसून अंगावर भरजरी दागिने, डोळ्यात आग आणि हातात त्रिशूल असा अल्लू अर्जुनचा अर्धनारी रुद्रावतार पाहून साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये एकही डायलॉग नसला तरी अल्लू अर्जुनच्या लूकने आणि त्याच्या अॅक्शनने सर्वांनाच प्रभावित केले.
तर या टीझरमध्ये गंगमा तल्ली जत्रेचे सीन आहेत. पण हा सीन केवळ जत्रेचा नाही तर भव्यदिव्य जत्रेचा सीन आहे. त्यामुळे पहिल्या पुष्पा सिनेमानंतर हा सिनेमा आणखीनच डोळे दिपवणारा असणार यात मुळीच शंका नाही. त्यामुळे या सिनेमासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे, हे नव्याने सांगण्याची गरजच नाही. पण सध्या टीझरमधील काही सेकंदाच्या सीनमध्ये इतक्या गोष्टी दिसल्या की, पुढे ट्रेलर आणि सिनेमात नक्की काय दिसणार याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. नुकतीच न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार पुष्पा २ सिनेमात दाख्ण्यात येणाऱ्या गंगमा तल्ली जत्रेच्या सीनसाठी बक्कळ पैसा खर्च करण्यात आला आहे. जत्रेचा हा सीन केवळ ६ मिनिटांचा असून या सीनसाठी तब्बल ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
टीझरमधील अल्लू अर्जुनच्या लूकवरील भरमसाठ खर्च, झगमगत्या लाईट, फटाक्यांच्या आतिषबाजी असं खूप काही भव्यदिव्य गोष्टी दिसत आहेत. तर हा ६ मिनिटांचा सीन शूट करण्यासाठी त्यांना अवघे ३० दिवस लागले आहेत. चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने याविषयी सांगितलं, “मी इतकंच म्हणू शकतो की हा खूप मोठ्या बजेटचा सेट होता. संपूर्ण सेट उभारण्यासाठी खूप पैसा खर्च करण्यात आला आहे. निर्मात्यांनी या सीनवर खूप मेहनत घेतली आहे, कारण चित्रपटाच्या कथेसाठी हा सीन खूप महत्त्वाचा आहे. शूटिंगदरम्यान अल्लू अर्जुनची पाठ खूप दुखत होती, मात्र तरीही त्याने शूटिंग पूर्ण केलं.”
त्यामुळे आता पुष्पा २ सिनेमासाठी साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.