सध्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार एका सिनेमातून किंवा कार्यक्रमातून अनेकदा एकत्र झळकतात. त्यामुळे त्यांची ही जुगलबंदी आणि त्यांची भन्नाट कलाकृती पाहण्यासाठी त्यांचे चाहते आणि संपूर्ण प्रेक्षकवर्ग कायम उत्सुक असतो.
अशीच कलाकृती असलेला एक नवा सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा नवा सिनेमा म्हणजे ‘सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ.’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अन् अवघ्या काहीच वेळात सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. हा ट्रेलर पाहताच प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांनी थैमान घातलं हे नक्की. या सिनेमाचे दिग्दर्शन ‘मिखिल मुसळे’ यांनी केले असून दिनेश विजन यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.
सजिनी शिंदे कशी बेपत्ता होते? का होते? याला जबाबदार नक्की कोण? ती खरंच जिवंत आहे की नाही? अशा अनेक प्रश्नांच्या शोधात असताना ये मोहिमेला येणारं अनपेक्षित वळण हेच या सिनेमाचं सार आहे. तर या सिनेमात भाग्यश्री, राधिका मदन, निम्रत कौर या प्रसिद्ध अभिनेत्रींसह सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शशांक शिंदे आणि सुमित व्यास हे प्रसिद्ध अभिनेते प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या सिनेमाची रंजकता आणखीच वाढली आहे.
सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ या सिनेमाचा ट्रेलर शेअर करून अभिनेते सुबोध भावे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक परफेक्ट बेटी, एक परफेक्ट मंगेतर, एक परफेक्ट टीचर और एक वायरल व्हिडीओ.” तसेच दिग्दर्शक मिखिल मुसळे यांनी सिनेमाबद्दल व्यक्त होताना म्हणाले की, “या चित्रपटाची कथा एका सामाजिक थरारपटाच्या सेटअपमध्ये तयार करण्यात आली आहे आणि त्यात हिंदी आणि मराठी कलाकारांच्या प्रतिभावान समूहाचे उत्तम मिश्रण आहे. त्यांची उल्लेखनीय कामगिरी चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. आम्हाला आशा आहे की चित्रपटाला खूप प्रेम मिळेल कारण कलाकारांनी या चित्रपटात सर्वोत्कृष्ट काम केले आहे.”
तर मॅडॉक फिल्म्सचे निर्माते दिनेश विजन म्हणाले की, “मॅडॉकमध्ये आमचा कंटेंट वितरित करण्यावर विश्वास आहे आणि पुन्हा एकदा ‘साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’सह आम्ही तेच केले आहे. हा एक सामाजिक थरारपट आहे जो तुम्हाला खिळवून ठेवतो आणि आम्हाला आशा आहे की प्रेक्षकांना तो पाहताना आनंद मिळेल.”
अनेक रहस्यांनी भरलेली ही कथा लवकरच उलगडणार आहे, कारण येत्या २७ ऑक्टोबर २०२३ रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.