‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान सोबत झळकणार ही अभिनेत्री…
आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये ‘आमिर खान’ने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. तसेच चित्रपटांव्यतिरिक्त सत्यमेव जयते, पाणी फाउंडेशन यांसारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याने चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. तो एक उत्तम अभिनेता आहेच. पण त्याच बरोबर तो उत्तम दिग्दर्शक देखील आहे. त्यामुळे त्याच्या कायम चर्चा पाहायला मिळतात.
फोरेस्ट गम्प या सिनेमावर आधारित हिंदीमध्ये प्रदर्शित झालेला लाल सिंह चढ्ढा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटानंतर त्याला चांगलाच धक्का बसला होता. त्याला ट्रोल देखील करण्यात आले होते. या चित्रपटानंतर त्याने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला अशी चर्चा रंगली होती.
पण आता आमिर खान त्याच्या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला असून त्याने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचं ठरवलं आहे. आमिरनं लाल सिंग चढ्ढानंतर त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून त्याचे नाव ‘सितारे जमीन पर’ असे आहे. या चित्रपटामध्ये आमिर सोबत बॉलिवूडची अभिनेत्री ‘जेनेलीया डिसूझा’ ही मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले आहे.
या चित्रपटासाठी आमिरने जेनेलियाचं नाव सुचवल्याचे सांगण्यात येत आहे. जेनेलिया आणि आमिर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे ही अनोखी जोडी पहिल्यांदा पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. तब्बल एक वर्षानंतर आमिर पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्या सादरीकरणासाठी आमिर खान हा नेहमीच ओळखला जातो. लाल सिंह चढ्ढा या सिनेमाच्या अपयशानंतर ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा आमिरला यश मिळवून देईल का? याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.