‘शिवरायांचा छावा’ची ऐतिहासिक कामगिरी, ठरला टाईम्स स्क्वेअर वर झळकणारा पहिलाच मराठी सिनेमा
सध्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेला मराठी सिनेमा म्हणजे ‘शिवरायांचा छावा.’ या सिनेमाने रसिक प्रेक्षकांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माते दिग्पाल लांजेकर यांनी सुरु केलेल्या ‘शिवराज अष्टका’तून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा आणि अनेकदा न पाहिलेला इतिहास अनेक सिनेमांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांसमोर घेऊन आले. यामध्ये एकूण आठ सिनेमे प्रदर्शित होणार असून त्यापैकी फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार हे पाच सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
आता पुन्हा एकदा त्यांनी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. तो सिनेमा म्हणजे ‘शिवरायांचा छावा.’ हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांवर नाही तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित आहे. एकदम मोठ्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती झाली असून या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण महाराष्ट्रातच झाले. मागील महिन्यातच या सिनेमाची घोषणा झाली अन् काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले.
हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी बराच काळ असला तरी प्रदर्शनापूर्वी या सिनेमाने नवनवीन रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. शिवरायांचा छावा या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक मोठा रेकॉर्ड केला आहे. न्यूयाॅर्कमधील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित टाईम्स स्क्वेअर वर नुकतेच शिवरायांचा छावा या सिनेमाचे पोस्टर झळकले. टाईम्स स्क्वेअरवर झळकणारा हा पहिलाच मराठी सिनेमा ठरला आहे. तर या सिनेमाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आता देशभरातच नाही तर जगभर या सिनेमाचा बोलबाला सुरु झाला आहे.
शिवरायांचा छावा हा बहुप्रतीक्षित सिनेमा यावर्षी नाही तर नव्या वर्षात १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सिनेमागृहात झळकणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून राजमाता जिजाऊ साहेबांच्या भूमिकेत पुन्हा एकदा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी दिसणार आहेत. त्यांच्यासह विक्रम गायकवाड, अभिजित श्वेतचंद्र, भूषण विनतरे आणि अमित देशमुख हे कलाकार देखील झळकणार आहेत. त्यामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे.