अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा मनोरंजनसृष्टीतील एक अतिशय हुशार कलाकार. संकर्षण नुकताच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत दिसून आला होता. याशिवाय तो नाटकांमध्ये देखील काम करतो. सध्या त्याचं ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक खूपचं गाजतयं. हे नाटक बघायला अनेक कलाकार मंडळी देखील हजेरी लावताना दिसून येत आहे.
संकर्षण सोशल मिडियावर नेहमीच सक्रीय असतो, तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट देत असतो. ‘तू म्हणशील तसं’ या नाटकादरम्यानचे अनेक किस्से त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी या नाटकाला शर्मन जोशीने हजेरी लावली होती. शर्मनबरोबरचा फोटो शेअर करत त्याने कॅप्शन लिहिले की, “तू म्हणशील तसं’च्या कालच्या प्रयोगाला पहिल्या रांगेत अंधारात कुणीतरी ओळखीचा चेहरा दिसला.. मी पहिल्या प्रवेशाच्या एक्झिटनंतर आतून डोकवून पाहिलं तर, बॉलिवूडमधील लाडका, फेमस अभिनेता शर्मन जोशी आला होता. पूर्ण प्रयोग त्यांनी मन लावून पाहिला.. त्यांना नाटक खूssssप आवडलं .. खूप कौतुक पण केलं .. फार फार भारी वाटलं बघा.. स्टाईल, गोलमाल, ३ ईडियट्स सारख्या सिनेमांत पाहिलेला हा माणुस आपलं कौतुक करत होता.. मज्जा आली ? आणि काम तुम्ही कुठेही करा हो.. नाटकाशी जोडलेला माणुस नाटकाकडे येतोच.” अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
अभिनेता शर्मन जोशी याने त्याच्या अभिनयाची एक वेगळी छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. त्याने त्याच्या अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली होती. गुजराती, हिंदी भाषेतील नाटकांमध्ये त्याने काम केले आहे. ‘बबलू बॅचलर’ या चित्रपटात तो शेवटचा झळकला होता.
संकर्षणच्या या नाटकाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. तर नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांनी केली आहे. या नाटकात संकर्षण बरोबर काजल काटे देखील आहेत. सध्या या नाटकाचे अनेक प्रयोग होत असून नाटकाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.