मराठी कलाविश्वातील बोल्ड, ब्युटीफूल आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे ‘सई ताम्हणकर’(Sai Tamhnkar). सईने मराठीसह बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने चांगलाच ठसा उमटवला आहे. सईला ‘मिमी’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे.
सई आत्तापर्यंत दुनियादारी, हंटर, तू हि रे, नो एन्ट्री अशा अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये झळकली आहे. आता लवकरच सई ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती सध्या अनेक मुलाखती देताना दिसत आहे. तिने नुकतीच एक मुलाखत दिली, त्यामध्ये सईने अनेक किस्से सांगितले. या मुलाखतीमध्ये सईने तिच्या वैयक्तिक तसेच इंडस्ट्रीमध्ये कराव्या लागणाऱ्या तडजोडींवर भाष्य केले.
या दरम्यान सईला, मराठीसह हिंदीमध्ये काम करताना कोणत्या सहअभिनेत्याने सर्वात जास्त सांभाळून घेतले? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सई म्हणाली की, “पहिलं नाव मी घेईन गुलशन देवैयाचं. आम्ही ‘हंटर’मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यात आमच्या दोघांच्या वाट्याला खरंच खूप कठीण सीन्स होते आणि मी दुसरं नाव घेईन विजय सेतुपती. त्यांच्याबरोबर मी ‘नवरसा’ चित्रपटासाठी काम केलंय. अर्थात ‘नवरसा’मध्ये काम करताना माझ्या भाषेचा प्रॉब्लेम होता. मी डायलॉग रट्टा मारुन गेले होते. त्यातले तीनच डायलॉग तसेच राहिले. बाकी ६ डायलॉग नवीन आले. मी पहिले ३ टेक मख्खं मुलीसारखी बसले होते. माझ्या तोंडून एक शब्द फुटत नव्हता. माझ्या शेजारी बसलेली मुलगी माझ्या मैत्रिणीची भूमिका साकारणार होती. बिजॉय नाम्बियार दिग्दर्शक होता. मी बिजॉयला म्हणाले की, तिला माझी भूमिका करू दे. माझ्याने हे होईल असं वाटत नाही. तेव्हा संपूर्ण सेटसमोर बिजॉय मला ओरडला आणि म्हणाला, तू तुझा जॉब कर सई.. हे विजय सरांच्या लक्षात आलं.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “समोर विजय सेतुपती बसले होते आणि तीन टेक झाले तरी माझ्या तोंडातून वाक्य निघत नव्हतं, मला खूप टेन्शन आलं होतं. इथून मला बाहेर काढा, मी कुठेतरी पळून जाते, असं मला वाटत होतं. विजय सरांनी ते पाहिलं आणि मला म्हणाले, मी जेव्हा हिंदी बोलतो तेव्हा मला असंच होतं. त्यामुळे काळजी करू नकोस. मी तुला एक ट्रिक सांगतो. ती फॉलो कर मग आपला टेक ओके होईल. त्यांनी मला ट्रिक सांगितली. मी ती फॉलो केली आणि दुसरा टेक ओके झाला. मला वाटतं की एखादा माणूस कुठल्या जागी काम करतोय आणि त्याचं वागणं काय आहे. याचं काही कनेक्शन नसतं आणि ते नसावं.”
२०२१ साली नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘नवरसा’ या सिरीज मध्ये सई ताम्हणकर विजय सेतुपती यांच्यासोबत झळकली होती. या सिरीजमध्ये सूर्या, अरविंद स्वामी, प्रकाशराज अशी तगडी स्टार कास्ट देखील होती.