मराठी सिनेसृष्टीत मागील काही दिवसांपासून लग्नाचे वारे वाहत आहेत. आपल्या सर्वांचे लाडके कलाकार एका मागोमाग एक लग्नबंधनात अडकत आहेत. त्यात आता सर्वांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) हिची देखील भर पडली आहे.
छोट्या पडद्यापासून ते रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने असंख्य चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे. आधी देवयानी या मालिकेमुळे त्यानंतर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वामुळे शिवानीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. अजिंक्य सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. तर दुसरीकडे आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या झिम्मा २ या सिनेमामुळे शिवानी पुन्हा एकदा चर्चेत आली. पण आता मात्र तिच्या सिनेमाची चर्चा नसून तिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
काल शिवानीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. तिने तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अजिंक्य ननावरे याच्यासोबत गुपचूप साखरपुडा केला. यापूर्वी कोणतीही घोषणा न करता तिने सरळ त्यांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. शिवानीने साखरपुड्यावेळी जांभळ्या रंगाची साडी तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता अन् त्यावर डिझाईनर जॅकेट घातला आहे. ही पोस्ट शेअर करत शिवानीने लिहिले की, “अखेर साखरपुडा पार पडला.” तिने अचानक दिलेल्या या आनंदाच्या बातमीमुळे तिचे चाहते प्रचंड खुश झाले.
साखरपुड्यानंतर लगेचच आता त्यांचा विवाहसोहळा देखील संपन्न झाला आहे. यावेळी दोघांनी एकमेकांना साजेशे असे पेस्टल पिंक रंगाचे कपडे घातले होते. त्या दोघांच्या सप्तपदी दरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तर त्यांचे चाहते त्यावर त्यांना भरभरून प्रेम देत आहेत.
View this post on Instagram
शिवानी आणि अजिंक्य यांची पहिली भेट ही ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली. याच सेटवर त्यांची मैत्री झाली अन् हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. शिवानी आणि अजिंक्य हे दोघेही २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहेत. तसेच या दोघांनी आधीच सांगितले होते की, ते २०२४ मध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. आणि आज त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालंय. मालिकेच्या सेटवर सुरु झालेल्या नात्याचा प्रवास आज थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि अग्नीच्या साक्षीने संसाराच्या वळणावर येऊन ठेपला आहे.
त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. शिवानी आणि अजिंक्य यांचा हा विवाहसोहळा काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला आहे. त्यांच्या व्हायरल होणाऱ्या या पोस्टवर चाहते आणि अनेक कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
हे देखील वाचा : विजय सेतुपती सई ताम्हणकरला म्हणाले,”…ही ट्रिक फॉलो कर”