महाराष्ट्राला वेड लावणारी मराठमोळी जोडी रितेश आणि जेनेलिया यांचा ‘वेड’ हा आगामी चित्रपट येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जेनेलिया पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहे.
वेड हा चित्रपट म्हणजे प्रेमातल्या वेडेपणाची गोष्ट आहे. या चित्रपटातील प्रमुख अभिनेता आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक रितेश देशमुख सध्या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आतपर्यंत रितेश आणि जेनेलिया यांनी वेगवेगळ्या प्रकारे चित्रपटाचे प्रमोशन केले.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हे दोघे पती-पत्नी कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेण्यासाठी पोहचले. परंतू यावेळी असे काही घडले की त्यामुळे रितेशला माफी मागावी लागली. रितेशच्या पीआर टीमने माध्यमांना योग्य वागणूक न दिल्याची तक्रार एका पत्रकाराने केली होती. पत्रकाराने असा आरोप केला की, रितेशच्या बाऊंसरने पत्रकारांना कोल्हापुर मधील हॉटेलमधून बाहेर ढकललं. यामुळे रितेशने झाल्या प्रकरणाबद्दल सर्वांसमोर माफी मागितली.
माध्यमांशी संवाद साधताना रितेश म्हणाला की, “आमच्याकडून तुमचा अवमान झाला असेल तर मी माफी मागतो. मी कोणत्याही बैठकीचं आयोजन केलं नव्हतं. लग्नाला ११ वर्षे झाली, पण आम्ही कधीच महालक्ष्मीच्या मंदिरात देवीचं दर्शन घेतलं नव्हतं. म्हणून मी आणि जेनेलिया इथे दर्शनासाठी आलो असताना चित्रपटाबद्दल बोलणं योग्य नाही. तुमच्यावरही महालक्ष्मीचा आशीर्वाद असू दे.”
तर आता रितेश आणि जेनेलिया यांचा वेड हा चित्रपट प्रेक्षकांना किती वेड लावतोय हे पाहणे उत्सुकतेचे आहे.