लोकप्रिय गायिका ‘श्रेया घोषाल’ (Shreya Ghoshal) ही भारतातील एक सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून ओळखली जाते. भारतातील उच्च गायकांच्या यादीत श्रेयाचं नाव घेतल जात. तिने आत्तापर्यंत अनेक हिट गाणी गायली आहेत. तिचं प्रत्येक गाणं चाहत्यांच्या मनावर अगदी कोरले आहेत. आज तिचे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात लाखो करोडो चाहते आहेत.
श्रेयाचा जन्म १२ मार्च १९८४ मध्ये बंगाली ब्राम्हण कुटुंबात पश्चिम बंगाल मधील ‘ब्रम्हपुर’या छोट्याश्या गावात झाला होता. तिचे कुटुंब अगदी सरळ आणि साधे आहे. तिचे वडील ‘विश्वजित घोषाल’ हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत, तर तिची आई ही गृहिणी आहे आणि त्यासोबतच एक उत्तम गायिका देखील आहे. श्रेयाला उत्तम गायनाचा वारसा हा तिच्या आईकडूनच मिळाला. श्रेयाच्या वडिलांची बदलीची नोकरी असल्या कारणाने त्यांना सतत एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागायचे. त्यामुळे श्रेयाचे शिक्षण देखील वेगवेगळ्या शहरात झाले. वडिलांच्या नोकरीमुळे श्रेयाने ८ वी पर्यंतचे शिक्षण राजस्थानमधील रावतभाटा इथे झालं, त्यानंतर तिच्या वडिलांची बदली मुंबईला झाली आणि तिचे पुढचे सर्व शिक्षण हे मुंबईमध्ये झाले. श्रेयाला एक लहान भाऊ देखील आहे.
वयाच्या चौथ्या वर्षापासून श्रेयाने गायला सुरुवात केली होती. तिच्या आईसोबत ती घरातच गायची. त्यांनतर तिची गायनाची आवड पाहता तिच्या आईने तिला वयाच्या सहाव्या वर्षी शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. तिने कल्याणजी भाईंकडे १८ महिने प्रशिक्षण घेतले. वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजेच साल २००० मध्ये तिने टीव्ही रिॲलिटी शो ‘सा रे गा मा पा’ भाग घेतला होता आणि ती त्या पर्वाची विजेती देखील ठरली.
२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लिला भन्साळी यांच्या ‘देवदास’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. संजय यांच्या आईने श्रेयाला ‘सा रे गा मा पा’मध्ये गाताना पाहिले होते आणि त्यांनीच तिचं नाव संजय यांना सुचवले होत. या सिनेमात तिने एकूण पाच गाणी गायली, आणि तिने गायलेली सर्व गाणी हिट झाली. या सिनेमातील तिने गायलेले पहिले गाणे होते ते म्हणजे ‘बैरी पिया’, हे गाण तिने जेष्ठ गायक उदित नारायण यांच्यासोबत गायले होते. हे गाणं जेव्हा रेकॉर्ड करण्यात आलं तेव्हा श्रेया केवळ १६ वर्षांची होती. या गाणाचा सराव करत असताना श्रेयाने डोळे बंद करून एका दमात हे गाणे गायले आणि तेच गाणं संजय यांनी रेकोर्ड करून घेतलं आणि तेच गाणं प्रदर्शित देखील झालं. याच सिनेमातील गाण्यासाठी तिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला.
श्रेयाने आत्तापर्यंत हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती, तेलुगु, कन्नड, आसामी, बंगाली यांसारख्या २० हून अधिक भाषांमध्ये जवळपास ३००० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यातील १००० पेक्षा जास्त गाणी तिने हिंदी भाषेमध्ये गायली आहेत.