जगातील सगळ्यात जास्त प्रतिष्ठेचा आणि मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘ऑस्कर’(Oscar). काल म्हणजेच ११ मार्च रोजी ‘ऑस्कर २०२४’ हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस मधील डॉल्बी थियेटरमध्ये पार पडला. यंदाचं पुरस्कार सोहळ्याचे हे ९६ वे वर्ष होते. अगदी दिमाखदार पद्धतीने हा सोहळा पार पडला.
यामध्ये ‘ओपनहायमर’या सिनेमाने बाजी मारली. तब्बल ७ पुरस्कार या सिनेमाने आपल्या नावे केले. तसेच ‘सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स’ या श्रेणीत ‘गॉडझिला मायनस वन’ सिनेमाने पुरस्कार जिंकत इतिहास रचला. या श्रेणीत तब्बल ७० वर्षानंतर एका जपानी कंपनीच्या सिनेमाला नामांकन मिळाले होते आणि पहिल्यांदाच त्यांना पुरस्कार देखील मिळाला.
तसेच या पुरस्कार सोहळ्यात भारताला अभिमान वाटेल अशी एक गोष्ट देखील घडली आहे. पुरस्कार सोहळ्यात मागील वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या अनेक कलाकारांना, दिग्दर्शकांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि दिग्गज कलादिग्दर्शक ‘नितीन देसाई’ यांना देखील आदरांजली वाहण्यात आली. ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट होती.
दरवर्षी या पुरस्कार सोहळ्यात काहीना काही विचित्र गोष्टी घडतच असतात. यावेळी देखील असेच काहीसे झाले आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता यावेळी स्टेजवर नग्नावस्थेत आला. त्याला पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि हसायला लागले. त्याचा हा नग्नावस्थेतील व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून जॉन सीना होता. त्याच स्टेजवर येणाचं कारण हे ‘सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर’हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी तो आला होता. यावेळी त्याने पोषाख किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित केले. यावेळी तो म्हणाला, “पोषाख हा महत्त्वाचा आहे, कदाचित सर्वात जास्त महत्त्वाचा आहे.”
हे देखील वाचा: लोकप्रिय गायिका ‘श्रेया घोषाल’ बद्दल बरंच काही…
हे पाहून सगळ्यांना १९७४ साली पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्याची आठवण झाली. त्यावेळी देखील असेच काहीसे घडले होते. त्यावेळी पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालक डेव्हिड निवेन हे अभिनेत्री ‘एलिझाबेथ टेलर’बद्दल बोलत असताना एक अभिनेता मागून नग्नावस्थेत स्टेजवर पळत आला होता. जवळपास ५० वर्षानंतर याची पुनरावृत्ती झाल्याच पाहायला मिळालं.
पण या मागची खरी गंमत म्हणजे ‘जॉन सीना’ जरी आपल्याला नग्नावस्थेत दिसून आला होता, तरी त्याने स्कीन कलरचे कपडे घातल्याचे दिसून आले. त्याचे स्टेजच्या मागील काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्याचे हे पितळ देखील उघड पडल.
दरम्यान ‘सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर’ हा पुरस्कार यंदा ‘हॉली वॉडिंग्टन’ हिला ‘पूअर थिंग्स’ या सिनेमासाठी मिळाला.