बिग बॉस १४ ची विजेती रुबिना दिलैकच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. ती तिच्या प्रेग्नंसीचे दिवस एन्जॉय करत आहे. रुबिना व अभिनव यांनी बिग बॉसच्या १४ व्या पर्वात भाग घेतला असून २०२० ते २०२१ या कालावधीमध्ये सुरू असलेल्या पर्वाची विजेती रुबिना होती. २०१८ मध्ये रुबिनाने अभिनव सोबत लग्नगाठ बांधली. रुबिना व अभिनव हे दोघे बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण त्यांनी त्यांच्या नात्याला एक चान्स देण्यासाठी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला व प्रत्येक टास्कमध्ये एकमेकांना सांभाळून घेत पुन्हा एकदा नव्या वाटचालीसाठी सुरुवात केली. लवकरच ते दोघे आई-वडील होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या प्रेग्नंसीची चर्चा होती. मधल्या काळात तिने सोशल मिडियावर फोटो पोस्ट करत यावर शिक्कामोर्तब केले. तिचा आनंद द्विगुणित झाला असून ती जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचे तिने एक व्हिडीओमध्ये सांगितले आहे.
व्हिडीओत रुबिना सांगते, “जेव्हा आम्हाला समजलं की आम्ही जुळ्या मुलांचे आई-वडील होणार आहोत, तेव्हा अभिनवला आश्चर्याचा धक्काच बसला होता. आम्ही दोघं गाडीत संपूर्ण वेळ एकमेकांशी बोललो नाही. आम्ही खुश नव्हतो, अशी बाब नव्हती. फक्त हे खरंच असं होणार आहे का?, यावर आमचा विश्वास बसत नव्हता. डॉक्टरांनी मला तीन महिन्यांपर्यंत ही गुड न्यूज कोणालाच न सांगण्यास सांगितली होती. तीन महिन्यांनंतर जेव्हा तपासणी झाली, तेव्हा सोनोग्राफीदरम्यान जुळ्या मुलांना पाहून आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही खूप खुश आहोत.”
याच तपासणीनंतर घरी परतत असताना अभिनव आणि रुबिनाच्या कारचा अपघात झाला होता. याविषयी ती पुढे म्हणाली, “सोनोग्राफीनंतर आम्ही जेव्हा घरी जात होतो, तेव्हाच आमच्या कारचा अपघात झाला. मागून एका ट्रकची धडक आमच्या कारला लागली. त्यावेळी माझ्या डोक्याला आणि पाठीला धक्का लागला होता. ती घटना आठवल्यानंतर आजसुद्धा मला खूप भीती वाटते. माझ्यासाठी तो काळ खूप वाईट होता. त्यानंतर आम्ही इमर्जन्सी सोनोग्राफी केली. दोन्ही बाळ ठीक आहेत का, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं होतं. पण देवाच्या कृपेने सर्वकाही ठीक होतं. आजसुद्धा जेव्हा मला ती घटना आठवते, तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके वाढतात.”