इरफान खान हा असा भारतीय कलाकार आहे ज्याने भारतीय चित्रपटासोबतच हॉलिवूडमध्येही काम केलेले आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्हीकडे इरफान खानने आपली वेगळी अशी ओळख तयार केली. इरफान खान यांचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी राजस्थानच्या एका नवाबी कुटुंबात झाला. त्याचे पूर्ण नाव साहेबजादे इरफान अली खान असे आहे.
इरफान खानला लहानपणापासूनच क्रिकेटचे खूप वेड होते आणि त्यांना लहानपणी एक क्रिकेटपटू व्हायचे होते. अभिनय क्षेत्रात तो अगदी ओघओघानेच आला. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर इरफानने बरीच सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
घरादारापासून लांब आलेल्या इरफानने एव्हाना अनेक दिग्दर्शकांकडे रांगा लावायला सुरुवात केली होती. याच वेळी दोन वेळेची भूक भागावी व राहण्यासाठी आसरा मिळावा म्हणून त्याने एका मित्राच्या मदतीने एसी मेकॅनिक म्हणून काम करायला सुरुवात केली. याच दरम्यान त्याने दूरदर्शन, सेट इंडिया, स्टार प्लस या सुरुवातीच्या काळातील मनोरंजन वाहिन्यांमध्ये मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली होती.
इरफान खानने आपल्या कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शन मालिकांमधून केली. त्याच्या सुरुवातीच्या काळात तो चाणक्य, भारत एक खोज, चंद्रकांत यासारख्या मालिकांमध्ये दिसला आणि मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. त्याची छोटीशी भूमिका असलेल्या या चित्रपटाला जागतिक स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले, तर ऑस्करसाठी नामांकनदेखील मिळालेलं. लंडनस्थित दिग्दर्शक असिफ कपाडिया यांनी भारतात ‘द वॉरीअर’ या चित्रपटासाठी नायक म्हणून इरफान खानची निवड केली गेली. त्याच्या या चित्रपटाने आंतरराष्ट्रीयस्तरावर कीर्ती मिळवली.
इरफानसोबत एनएसडीमध्ये शिकणाऱ्या तिग्मांशू धुलियाने इरफानला २००३ मध्ये ‘हासिल’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणाऱ्याची संधी दिली. या भूमिकेसाठी त्याला पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिग्मांशूच्या ‘चरस’, ‘पानसिंग तोमर’, ‘बेगम सामरू’, ‘साहेब, बीबी और गँगस्टर रिटर्न’, ‘बुलेट राजा’ या चित्रपटात इरफान झळकला. ‘पानसिंग तोमर’साठी इरफानला अभिनयाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. मॅकबेथवर आधारित ‘मकबूल’मधील भूमिकेने त्याने आपलं वेगळेपण सिद्ध केलं. ‘रोग’ चित्रपटानंतर तो खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टीत स्थिरस्थावर झाला.
‘मेट्रो’, ‘द नेमसेक’, ‘स्लम डॉग मिलेनिअर’, ‘मुंबई मेरी जान’, ‘न्यूयॉर्क’, ‘सात खून माफ’, ‘द लंच बॉक्स’, ‘हैदर’, ‘तलवार’, ‘पिकू’, ‘हिंदी मीडियम’, ‘करीब करीब सिंगल’ या सगळ्याच चित्रपटांसाठी इरफानला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. २०११ मध्ये त्याला ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ‘ज्युरासिक वर्ल्ड’, ‘द अमेझिंग स्पायडरमॅन’, ‘लाईफ ऑफ पाय’, ‘लाईफ इन मेट्रो’, ‘सच अ लॉंग जर्नी’ सारख्या इंग्रजी चित्रपटांतूनही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ‘द ट्रिटमेंट’ या इंग्रजी मालिकेत त्याने साकारलेल्या ‘सुनीलने अमेरिकेतील प्रेक्षकांची देखील दाद मिळवली.