‘बिग बॉस’ ‘खतरो के खिलाडी’नंतर शिव ठाकरे ‘या’ रिअॅलिटी शोमध्ये दिसणार :
मराठी असो वा हिंदी रिअॅलिटी शोमध्ये आपल्या खऱ्या स्वभावाने असंख्य रसिक प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवणारा लोकप्रिय मराठमोळा अभिनेता म्हणजे ‘शिव ठाकरे.’
आजवर शिवने मराठी बिग बॉस, हिंदी बिग बॉस, रोडीज, खतरों के खिलाडी यांसारख्या अनेक शोमधून कमालीची कामगिरी करत प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे त्याला नवनवीन शोमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. तर आता लवकरच शिव पुन्हा एकदा नवीन शोमध्ये दिसणार आहे. तर यावेळी तो छोट्या पडद्यावरील ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात त्याची आणखी एक झलक प्रेक्षकांना दाखवणार हे नक्की.
अनेक वर्षांपासून सुरु असलेला झलक दिखला जा हा शो प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहे. आत्तापर्यंत या शोचे तब्बल १० पर्व पार पडले आहेत. तर आता लवकरच या शोचे ११ वे पर्व देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर या शोमधील प्रत्येक कलाकाराने त्याच्या अप्रतिम नृत्याने साऱ्या भारतीयांच्या पसंतीस उतरले. यावेळी कोणते स्पर्धक हा मंच गाजवायला येणार याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. तर नुकतीच या शोच्या स्पर्धकांची यादी समोर आली आहे.
त्यानुसार, मराठमोळा अभिनेता ‘शिव ठाकरे’सह कोरिओग्राफर रोमेश सिंह, ससुराल सिमर का फेम अभिनेता ‘शोएब इब्राहिम’सह कोरिओग्राफर अनुराधा अय्यंगर, द कपिल शर्मा शोमधील ‘राघव ठाकुर’, ‘उर्वशी ढोलकीया’, ‘आमिर अली’, बॉलिवूड अभिनेत्री ‘तनीषा मुखर्जी’, ‘संगीता फोगाट’, ‘अंजली आनंद’, अभिनेत्री ‘करुणा पांडे’ आणि ‘अदरीजा सिन्हा’. हे १० स्पर्धक म्हणून या शोमध्ये सामील होणार आहेत.
तर ऋत्विक धनजानी आणि गौहर खान हे ‘झलक दिखला जा’च्या ११ व्या पर्वाचे होस्ट असणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात आणखीन रंगत येणार आहे.