२०२२ हे वर्ष कन्नड चित्रपटसृष्टी खूप खास होतं. ‘केजीएफ २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता, त्यानंतर कांतारा या चित्रपटाने ‘केजीएफ २’ चे सगळे रेकॉर्ड मोडून एक वेगळाच इतिहास रचला. ऋषभ शेट्टीचा ‘कंतारा‘ सिनेमा गेल्या वर्षीचा सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट होता. फक्त दक्षिणेतच नाही तर हिंदी पट्ट्यातही सिनेमाने चांगली कमाई केली. छोट्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर अनेक विक्रम रचले. चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांना त्याच्या पुढच्या कथेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती, याचा विचार करून निर्मात्यांनी कांताराच्या प्रीक्वलची घोषणा केली. आता उगादीच्या निमित्ताने निर्मात्यांनी चाहत्यांना एक गोड बातमी दिली.
जानेवारी महिन्यात ‘कांतारा’ने चित्रपटगृहात १०० दिवस पूर्ण केले. अभिनेता दिग्दर्शक रिषभ शेट्टी आणि होमबाले फिल्म्सचे संस्थापक विजय किरगंदूर यांनी यानिमित्त जंगी सेलिब्रेशन केलं होतं. यादरम्यान रिषभ शेट्टीने ‘कांतारा २’बद्दल भाष्य केलं. ‘कांतारा २’ हा मूळ चित्रपटाचा प्रीक्वल असणार आहे असं रिषभने नमूद केलं. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
उगडी या कन्नड नववर्षानिमित्त होमबाले फिल्म्स आणि रिषभ शेट्टीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट दिले आहे. या पोस्टमधून त्यांनी ‘कांतारा २’च्या लिखाणाला सुरुवात झाल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रॉडक्शन हाऊसने ट्वीट करत म्हटले की, ‘उगादी आणि नवीन वर्षाच्या या शुभ मुहूर्तावर, आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, कांताराच्या दुसऱ्या भागाचे लेखन सुरू झाले आहे. आम्ही तुमच्यासाठी आणखी एक चित्तथरारक कथा आणण्याची अजून वाट पाहू शकत नाही. ही कथा निसर्गाशी आमचं नातं दर्शवणारी आहे.’
प्रेक्षक देखील आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या पोस्टवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले की, ‘सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत.’ तर दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘दुसरा मास्टरपीस लवकरच येत आहे.’ याशिवाय अनेक लोक या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत आहेत. विशेष म्हणजे, कांतारा कन्नडमध्ये ३० सप्टेंबरला आणि हिंदीमध्ये १४ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन ऋषभ शेट्टी यानेच केले होते. यासोबतच त्याने यात अभिनयही केला होता.