बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री क्रिती सेनॉन. क्रिती कामासह तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असते.
क्रिती सेनॉन आणि साऊथचा सुपरस्टार प्रभास हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या आणि त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याच्या बऱ्याच चर्चा आजवर रंगल्या आहेत. मात्र त्या दोघांकडून त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा झालेला नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने शक्यता वर्तवत आहे. पण आता स्वतः क्रिती तिच्या खासगी आयुष्यातील लव्ह लाईफबद्दल पहिल्यांदाच बोलताना दिसली आहे.
काही दिवसांपूर्वी क्रिती करण जोहरच्या शोमध्ये उपस्थित होती. यावेळी तिला तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तिने अगदी मोकळेपणाने या प्रश्नांची उत्तरे दिली. क्रिती तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगताना म्हणाली की, “मी सध्या खूप जास्त बिझी असल्यामुळे कदाचित माझ्या आयुष्यात कोणी नसावे. मी अजून कोणाला भेटले नाहीये अजून तरी…आता जरी माझ्या आयुष्यात कोणी नसले तरीही असे नाही की, अगोदर कोणी नव्हते.”
तसेच ती पुढे म्हणाली की,
“कदाचित आता खूप काम करण्याची वेळ आहे आणि माझ्या भोवती मला हवी तशी योग्य व्यक्ती नसावी. मला वाटते की, प्रेमामध्ये मी बऱ्याच वेळा खूप जास्त आंधळी होते. मी कायमच समोरच्या व्यक्तीवर खूप जास्त विश्वास ठेवते. मात्र, आता मी थोडी सर्तक झाली आहे. मी अगोदर समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून घेईल…मग हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवेल. मला वाटते की, कोणतेही नाते पूर्णपणे विश्वासावर आधारित आहे आणि त्याशिवाय हे नाते पुढे जाऊ शकत नाही. कोणीतरी असे म्हटले आहे की, प्रेमामध्ये माणूस आंधळा होतो.”
मध्यांतरी क्रितीने सुपरस्टार प्रभाससोबतच्या तिच्या नात्याच्या होणाऱ्या चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगितले. हे दोघे खऱ्या आयुष्यात एकत्र येतील की नाही हे येणारा काळच ठरवेल, पण त्यापूर्वी क्रिती आणि प्रभास ‘आदिपुरुष’ या आगामी सिनेमामध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यांचा हा सिनेमा १६ जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.