आपल्या सगळ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देखील आपण अनेक चित्रपट, मालिकांमधून आपण पाहिला. दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम दाखवणारा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट २ फेब्रुवारीला म्हणजे आजच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक होते. गेले अनेक वर्ष हा चित्रपट रखडला होता. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली. संकटाला निर्भीडपणे सामोरे जात आपल्या पराक्रमच्या जोरावर अल्प काळातच मराठ्यांचं साम्राज्य वाढवलं. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास जगजाहीर आहे आणि त्याच्या पराक्रमाला तोड देखील नाही.
या चित्रपटाची स्टारकास्ट देखील तितकीच तगडी आहे. यामध्ये प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के, अमित देशमुख, कै. आनंद अभ्यंकर, समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे दिसत आहेत. तसेच चित्रपटाचे संगीत देखील दमदार आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत तर अमर–अमित देसाई याचं पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले.
राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यामध्ये छत्रपती संभाजी महाराज रणांगणावरचे शेर होते. तसेच स्वराज्यनिष्टा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने मोहिमा यशस्वी करणाऱ्या महराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटातून आपल्याला पाहता येणार आहे. राजकारणातील डावपेच, गनिमी कावा या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी तब्बल नऊ वर्ष मुघल, आदिलशहा, सिध्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत स्वराज्य टिकवले आणि ते वाढवले देखील.
स्वराज्याचं संरक्षण करणाऱ्या या पराक्रमी राजाचा जीवनपट निर्माते राकेश सुबेसिंह दुलगज घेऊन आले आहेत. ही कथा सुरेश चिखले यांची असून छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजीमध्ये आज एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अनेक इेतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर आता छत्रपती संभाजी या चित्रपटाची देखील भर पडली आहे. आणि हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत.