मराठी सिनेसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni). सोनालीने आपल्या नृत्य कलेतून आणि अभिनयासह सौंदर्याने सगळ्यांना वेड लावलं आहे. आपल्या कौशल्याने सोनालीने मराठी सिनेसृष्टीत तिची एक वेगळीच छाप उमटवली आहे.
आतापर्यंत अनेक दमदार मराठी चित्रपटांमध्ये सोनाली झळकली आहे. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता साऊथमध्ये देखील धुमाकूळ घालायला सोनाली सज्ज आहे. ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या सिनेमातून सोनालीने साऊथममध्ये एन्ट्री केली. या सिनेमात तिने सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगु आणि कन्नड या भाषेत २५ जानेवारीला रिलीज झाला. तिझ्या नृत्याने आजवर जसे मराठी प्रेक्षक घायाळ झाले आहेत, तसे दक्षिणेतील प्रेक्षक देखील घायाळ होत आहेत. या सिनेमातील सोनालीच्या खास लूकचे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत.
नुकतंच एका मुलाखतीमध्ये सोनालीने तिचा साऊथइंडस्ट्री मधील काम करतानाचा अनुभव शेअर केला. त्यावेळी सोनालीला दाक्षिणात्य सिनेसृष्ट्रीमधील कोणती गोष्ट तुला मराठीमध्ये आणायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली की, “त्यांची भाषा आणि संस्कृतीप्रती असलेली लॉयलटी आपल्याकडे आणावी वाटेल. फक्त सिनेसृष्ट्रीत नाही तर इतर लोकही त्याला महत्त्व देतात. केरळमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्ही त्यांना इंग्रजीमध्ये बोलाल, तर ते तुम्हाला त्यांना येत असेल तरी उत्तरच देणार नाहीत. मुळात ८० टक्के लोकांना येत नाही. ते लोक त्यांची भाषा, संस्कृती, साहित्याच्या बाबतीत प्रचंड प्रामाणिक आहेत. तिथे ६०० स्क्रिन्स फक्त मल्याळम सिनेमांसाठी आहेत. मग इतर भाषेचे सिनेमे लागतात.”
View this post on Instagram
तसेच ती पुढे म्हणाली की, “फक्त चित्रपट नाही तर घरातही लोक फक्त मल्याळम बोलतात. आपल्याकडे तसे होत नाही. फिल्ममेकर, सरकार किंवा इतरांना त्याचा दोष देऊन चालणार नाही. आपल्या घरात मराठी शिकवण ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबादरी आहे. ठीक आहे ना तुम्ही आपल्या मुलांना कॉन्व्हेन्ट शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवा, त्यांना इतर सगळ्या भाषा शिकावा. पण, त्याचबरोबर त्यांना मराठी बोलता आली पाहिजे. ते लादून नाही तर आतून आलं पाहिजे. ते प्रत्येक कुंटुबाने केलं तर त्याचे पडसाद प्रत्येक क्षेत्रात पाहायाला मिळतील. आपल्या संस्कृतीला प्राधान्य दिलं पाहिजे.”
सोनालीचं हे उत्तर ऐकून तिचं मराठी भाषेवर, संस्कृतीवर आणि परंपरेवर असलेलं प्रेम तसेच ते निरंतर टिकवण्यासाठी तिची तळमळ दिसून येत आहे.