गदर, अर्जुन, त्रिदेव, चालबाज, यमला पगला दिवाना यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मन जिंकणारा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता सनी देओल. त्याने त्याच्या कारकिर्दीत बराच मोठा चाहतावर्ग कमावला आहे.
सनी देओल पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचे कारण म्हणजे सनी देओलचा आगामी चित्रपट. २ दशकांपूर्वी सुपरहिट ठरलेला ‘गदर: एक प्रेम कथा‘ या चित्रपटाच्या सिक्वेलमधून सनी देओल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गदर २ या चित्रपटाच्या निमित्ताने सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेलची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनी सनीने सोशल मीडियावर ‘हिंदुस्तान जिंदाबाद हैं.. जिंदाबाद था.. और जिंदाबाद रहेगा..’ असे कॅप्शन देतं ‘गदर २’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केले होते. या चित्रपटामध्ये सनी पुन्हा एकदा तारा सिंग आणि अमिषा सकिनाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पार पडलं आहे. तर या चित्रपटातील एक सीन लीक झाला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात गदर चित्रपटातील हँडपंप उखडून काढण्याचा सीन आहे. तर हा व्हिडिओ पाहून चाहत्यांची चित्रपटासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गदर २ या चित्रपटाचे दिग्दर्शन हे अनिल शर्मा करणार आहेत. तर त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा हा सनी आणि अमिषाच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. २ दशकांपूर्वी थिएटरमध्ये गाजलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’चा सिक्वेल ‘गदर २’ हा येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.