छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री ‘गौतमी देशपांडे’ (Gautami Deshpande) नुकतीच लग्नबंधनात अडकली. २५ डिसेंबर रोजी गौतमीने स्वानंद तेंडुलकर याच्यासोबत मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या ही जोडी प्रचंड चर्चेत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गौतमी व स्वानंदच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या एका फोटोमुळे चाहत्यांना त्यांच्या अफेअरची शंका आली होती. पण यावर दोघांनीही मौन पाळले होते. पण चाहत्यांची शंका मात्र खरी ठरली ती २३ डिसेंबरला. त्या दोघांनी थेट मेहंदीचे फोटो पोस्ट करून त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर दोघांचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला.
स्वानंद तेंडुलकर हा ‘भाडिपा‘ या युट्यूब चॅनेलचा व्हाइस प्रेसिडंट असून तो एक डिजिटल क्रिएटर देखील आहे. गौतमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेता विराजस कुलकर्णीसोबत ती ‘माझा होशील ना’ मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर याच जोडीचे ‘गालिब’ हे नाटक नुकतेच रंगभूमीवर गाजत आहे. तसेच गौतमी आणि स्वानंद या दोघांचा स्वतःचा असा वेगळा आणि प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नातील अनेक क्षणांचे फोटो आजही चांगलेच व्हायरल होत आहेत.
गौतमी व स्वानंद यांच्या लग्नातील मेहंदी सोहळ्यापासून ते रिसेप्शन पार्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. परंतू स्वानंद आणि गौतमीची ओळख कशी झाली, त्यांच लव्हमॅरेज आहे की अरेंज मॅरेज असे कितीतरी प्रश्न चाहत्यांना पडले होते. यामध्येच गौतमीने तिच्या लग्नातील एक व्हिडिओ शेअर करत तिची भन्नाट लव्हस्टोरी सांगितली. गौतमी आणि स्वानंद यांच लव्ह मॅरेज असून विशेष म्हणजे पहिल्याच भेटीत गौतमीने स्वानंदला नकार दिला होता. परंतू, त्याच्यासोबत मैत्री झाल्यानंतर ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली. त्यांच्या या प्रेमाचा प्रवास तिने लग्नातील एका व्हिडीओमध्ये संगितला आहे.
लग्नानंतर ते दोघे आता फिरायला गेले आहेत. गौतमी आणि स्वानंद कुठे सातासमुद्रापार न जाता ते दोघे आपल्या निसर्गसंपन्न कोकणात फिरायला गेले आहेत. दोघांचे कोकण दौऱ्याचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. दोघेही समुद्र किनारी एकमेकांसोबत वेळ घालवत आहे. त्यांनी रीशेअर केलेल्या स्टोरीमधील फोटो पाहता ते दोघेही देवबागला फिरायला गेल्याचे दिसत आहे.