बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. वयाच्या ६६व्या वर्षी सतीश कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाचे ट्वीट करत चाहत्यांना ही बातमी दिली. सतीश कौशिक यांच्या अकाली निधनाचे कारण नुकतंच समोर आलं आहे. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी देखील सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. त्यांच्या निधनाने भारतीय मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
सतीश कौशिक यांच्या आठवणींना उजाळा देत अभिनेत्री हेमांगी कवीने एक भावनिक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली. हेमांगीने सतीश कौशिक यांचा एक खास फोटो पोस्ट केला आहे. त्या पोस्टवर तिने खूपच भाऊक होऊन लिहिले की, “आम्ही आमच्या कॅलेंडरमधून आजचा हा दिवस वगळू शकतो का? लहानपणी आईने थोडा उशीर केला जेवण वाढायला की समोरचं ताट हातात घेऊन ते ग्लासने बडवत “कॅलेंडर खाना दो” मोठमोठ्याने म्हणायचं. मग आई “असं ताट वाजवू नये” म्हणून आम्हांला बडवायची. पण आम्ही कुठे ऐकतोय तिचं. ती जी सवय लागली ती आजतागायत. काय गंमत होती किंवा आहे त्यात कुणास ठाऊक.”
View this post on Instagram
तसेच पुढे तिने लिहिले की, “तुमच्या सोबत काम करताना मी हा किस्सा तुम्हांला सांगितला तेव्हा तुम्ही हसून म्हणाला, “८०-९० के हर बच्चे की यही कहानी है!” ८०-९०च्या दशकातल्या मुलांचं बालपण तुमच्या कॅलेंडरने समृद्ध केलंय आणि मनात कायमचं टिकही करून ठेवलंय! असं म्हणतात जुनं कॅलेंडर घरात ठेऊ नये पण हे कॅलेंडर मनाच्या भिंतीवर, आठवणींच्या खिळ्याला सदा अडकवलेलं राहील. सतीशजी तुमच्यासोबत काम करून खूप आनंद झाला.”
हेमांगीसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी सतीश कौशिक यांच्या आठवणींना उजाळा देत, पोस्ट शेअर करत श्रध्दांजली वाहिली.