अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे (Akhil Bharatiya Natya Parishad) आयोजित १०० व्या नाट्य संमेलनाला ५ जानेवारी पासून पुण्यातून सुरुवात झाली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित या शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दि. ५ जानेवारी रोजी पुण्यात झाला. या सोहळ्याचा प्रारंभ सकाळी पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते कार्यक्रम स्थळ असलेल्या गणेश कला क्रीडा मंचापर्यंत काढलेल्या नाट्ययात्रेने झाला. ढोल-ताशांचा गजर, ५०० दुचाकी आणि १० रथांवर विराजमान झालेले ज्येष्ठ कलाकार यांच्या सहभागाने सजलेल्या या नाट्ययात्रेने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले.
मराठी रंगभूमीवर अजरामर झालेल्या १०० नाटकांतील १०० व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत सजलेले कलाकार, फेटे, नऊवारी, नथ अशी पारंपरिक वस्त्रे व आभूषणे परिधान केलेल्या नाट्यप्रेमींच्या साथीने आकर्षक ‘नाट्ययात्रा’ काढली. दुचाकी आणि रथांसह निघालेल्या या दिमाखदार नाट्ययात्रेने १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याची नांदी झाली.
View this post on Instagram
मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे रंगमंचाचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन शुभारंभ सोहळ्यातील कार्यक्रमांना सुरुवात झाली. या नंतर ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे नाट्य संकीर्तन पार पडले.
सनई चौघड्यांचा मंगलमयी स्वर, लेझीम, ढोलताशांचा गजर, रांगोळ्या, पायघड्या, झब्बा-धोतर, नऊवारी साडी, फेटा असा मराठमोळा पेहराव केलेल्या अनेक मराठी कलाकारांनी नाट्यदिंडीमध्ये सहभाग घेतला होता. या दिंडीमध्ये, मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी या संमेलनाला हजेरी लावली. मराठी चित्रपट सृष्टीतील जुनी आणि लाडकी अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अभिनेत्री स्पृहा जोशी, प्रिया बेर्डे, सुकन्या मोने, सविता मालपेकर अभिनेता सुयश टिळक, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि अंशुमन विचारेही हजर होते. समीर चौघुले, विनोदाची क्वीन म्हणून लोकप्रिय असलेल्या निर्मिती सावंत, तेजश्री प्रधान ही कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित होती.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदि मान्यवर मंडळी याप्रसंगी नाट्यसंमेलनाला उपस्थित होती. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे विचार मांडले.