बॉलिवूडमधील सिनेमांमुळे कमी तर पंगा गर्ल म्हणून ओळखली जाणारी कंगना राणावत आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक कलाकार त्यांच्या अभिनयामुळे, ड्रेसिंग स्टाइलमुळे तर काही त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतातच. तशीच कंगना देखील आतापर्यंत तिच्या अनेक वक्तव्यामुळे आणि चर्चेचं कारण ठरेल अशा पोस्टमुळे कायम चर्चेत असते.
आज देखील तिच्या चर्चेचं कारण काही वेगळं नाही. तिने नुकताच एक फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. अन् त्यावर तिने लिहिले की, “या वेड्या आणि प्रतिभाशाली अनुराग बासूचे आभार ज्याने मला १७ वर्षांपूर्वी २८ एप्रिल २००६ रोजी लोकांसमोर आणले. या फोटोमध्ये तो आणि मी लाइफ इन मेट्रो या सिनेमाच्या सेटवर आहोत (२००६), तो मला अनेक गोष्टी शिकवत आहे… अन् त्यादरम्यान ‘तू चुप बस’ हे त्याचं आवडतं वाक्य…आय लव्ह यू अनु… सर्व गोष्टींसाठी धन्यवाद.”
तसेच तिने पुढे लिहिले की, “मला आजपर्यंत सांगण्यात आलं की अभिनेत्रींचं शेल्फ लाइफ फक्त ४ ते ५ वर्षे असते परंतू मी काल १७ वर्षे पूर्ण केली आहेत.” अनुराग बसू दिग्दर्शित ‘लाइफ इन अ मेट्रो’ हा सिनेमा २००७मध्ये प्रदर्शित झाला होता. शनिवारी कंगनाने इंन्स्टाग्राम स्टोरीवर याच सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला होता.
त्यामुळे तिने शेअर केलेल्या फोटोवर तिला अनेकजण शुभेच्छाही देत आहेत. तर आता आगामी काळात ती सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
कंगना लवकरच चंद्रमुखी भाग २ मध्ये दिसणार आहे. तसेच कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ या सिनेमाचे शूटिंगही नुकतेच पूर्ण झाले आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असून कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.