हिंदी बिग बॉसच्या १३ व्या पर्वातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे ‘शहनाज गिल (Shehnaaz Gill)’. शहनाज ही पंजाबची कतरिना कैफ म्हणून देखील ओळखली जाते. तसेच शहनाज उर्फ ‘सना’ची आज बॉलिवूडमधील सर्वाधिक ग्लॅमरस आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते.
शहनाजचा जन्म २७ जानेवारी १९९३ मध्ये चंदीगढमधील शीख घराण्यात झाला. तर तिचे शिक्षण तेथील डलहौजी हिलटॉप या शाळेत झाले असून तिने पुढील शिक्षण लवली युनिवर्सिटीमधील कॉमर्समधून पूर्ण केले. तेव्हापासूनच शहनाजला अभिनयाची प्रचंड आवड होती. तसेच त्यातच करिअर करून सिनेसृष्टीत आपले नावलौकिक करायची इच्छा होती. परंतू शूटिंग करून रात्री उशिरा घरी येणं त्यांना पटत नव्हतं, म्हणून तिच्या कुटुंबीयांनी शहनाजच्या या निर्णयाला विरोध केला. एवढेच नाही तर तिच्या मनातूनही हा विचार निघून जावा यासाठी तिच्या लहान वयातच तिचं लग्न करायचे ठरवले.
यासगळ्या परिस्थितीतून स्वतःला वाचविण्यासाठी कमी वयातच घर सोडलं. हळू हळू तिचे पाय सिनेसृष्टीकडे वळले. २०१५ साली तिने मॉडेलिंगच्या विश्वात पाऊल ठेवले. आणि त्याच वर्षात तिला ‘शिव दी किताब’ हे गाणं मिळालं. आणि तिचं हे पहिलं गाणं चांगलंच गाजलं. तेव्हापासून पंजाबी सिनेसृष्टीत शहनाजचा प्रवास सुरु झाला. या प्रवासात तिचे अनेक सिनेमे, गाणी आणि अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आले. लोकप्रियतेच्या शिखरावर चढत असतानाच शहनाज आणि हिमांशी खुराना यांच्याच ३६ चा आकडा झाला, त्यांच्यातील वादाचा परिणाम शहनाजच्या आगामी कामावर होवू लागला. काहीजण तिला डावलू लागले तर तिने काम केलेल्या सिनेमाच्या प्रिमिअर जाण्याची तिला मुभादेखील नव्हती. परंतू तिने हार न मानता तिचे काम सुरु ठेवले.
काम सुरु असताना शहनाज बिग बॉसच्या १३ व्या पर्वात सहभागी झाली. या शोमुळे तिची प्रसिद्धी चांगलीच वाढली. बिग बॉसमधील शहनाज प्रेक्षकांना इतकी भावली की या शोची ती सेकंद रनरअप झाली. या पर्वातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे शहनाज आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची गोड मैत्री. त्यांची ही मैत्री फक्त शोपूर्ती मर्यादित राहिली नाही तर शोमधून बाहेर पडल्यावर देखील हे दोघे अनेकदा एकत्र काम करताना दिसले. त्यामुळे हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत याची सर्वत्र जबरदस्त चर्चा रंगू लागली. परंतू त्याच दरम्यान सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका आला अन् वृत्तानुसार त्याने शहनाजच्याच मांडीवर जीव सोडला. पण आजही या दोघांच्या जोडीची तेवढ्यात प्रेमाने सर्वांना आठवण येते.
या धक्क्यातून स्वतःला सावरत शहनाज पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली. त्यानंतर सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले. तर आताच्या ‘थँक्यू फॉर कमिंग’ या सिनेमानंतर आता ती ‘सब फर्स्ट क्लास’मध्ये देखील झळकणार आहे.