मागील काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीत लगीन सराई सुरु आहे. एकामागोमाग एक आपले लाडके कलाकार आपल्या प्रिय व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधत आहे. तर आता या यादीत आणखी एका अभिनेत्याच्या नावाची भर पडली, तो अभिनेता म्हणजे प्रथमेश परब (Prathmesh Parab).
टाईमपास या मराठी सिनेमामुळे अभिनेता प्रथमेश परब प्रसिद्धीच्या झोतात आला. या सिनेमातील त्याचे अनेक डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरलेले आहेत. याचबरोबर ‘बालक-पालक’, ‘टकाटक’ यांसारख्या अनेक मराठी सिनेमातून त्याने तमाम प्रेक्षकांचे मन जिंकले. प्रथमेशने मराठीसह हिंदी सिनेसृष्टी देखील गाजवली. प्रथमेशचा ‘डिलिव्हरी बॉय’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सध्या मात्र त्याच्या या सिनेमाची किंवा इतर कोणत्याही कामाची चर्चा सुरु नसून त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
प्रथमेशने गेल्यावर्षी व्हॅलेंटाईन डेला त्याच्या प्रेमाची कबुली दिली. त्यामुळे यंदा प्रथमेश आणि क्षितिजा यांची लगीनघाई सुरु झाली आहे. प्रथमेश त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत लवकरच विवाहबद्ध होणार असून सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरु आहे. क्षितिजा ही एक शिक्षिका असून कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये ती काम करते. इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर टाईमपास ३ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते पहिल्यांदा भेटले. त्यानंतर त्यांच्या मैत्रीतून हळूहळू प्रेम फुलू लागलं, अन् ते रिलेशनशिपमध्ये आले. त्यामुळे आता त्यांच्या लग्नाबद्दल नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
View this post on Instagram
क्षितिजाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांच्या साखरपुड्याची आणि लग्नाची तारीख जाहीर केली. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा होणार असून साखरपुड्यानंतर १० दिवसांनी म्हणजेच २४ फेब्रुवारीला त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नाची तारीख जाहीर करताना तिने शेअर केलेले फोटो देखील खूपच सुंदर आहेत. तर या पोस्टला तिने तितकेच सुंदर कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये तिने त्यांच्या खास तारखांची बेरीज केली आहे. अन् योगायोगाने सर्व तारखांची बेरीज सारखीच येत असून त्याला ती इन्फिनिटी म्हणजेच अनंत असं म्हणाली आहे.
तसेच पोस्टच्या शेवटी तिने लिहिले की, “अनंत कायम आहे, आणि तेच माझ्यासाठी तू आहेस, तूच माझा सदैव आहेस.” तर त्यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते आणि कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. आता प्रथमेश आणि क्षितिजाच्या लग्नाला बरोबर एक महिना बाकी असल्यामुळे सगळीकडे त्यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे.