सिनेमे आणि वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या अनेक व्यासपीठांपैकी एक म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडच्या जिओ स्टुडिओज. जिओ स्टुडिओला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमावेळी जिओ स्टुडिओजने एक मोठी घोषणा केली की, आता मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, भोजपुरी अशा विविध भाषांतील एकूण १०० कथांवर आधारित सिनेमे आणि वेब सिरीज प्रदर्शित करणार आहेत. जियो स्टुडिओच्या या नवीन घोषणे अंतर्गत मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली यांसारख्या वेगवेळ्या भाषेत प्रचंड गाजलेले आणि निरनिराळे पुरस्कारप्राप्त सिनेमे प्रदर्शित होणार आहे.
‘बाईपण भारी देवा’, ‘गोदावरी’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, ‘फोर ब्लाइंड मेन’, ‘वनटूथ्रीफोर’, ‘खरवस’, ‘काटा किर्र्र’, ‘खाशाबा’ हे आगामी सिनेमे देखील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच ‘कालसूत्र’, ‘एका कलेचे मणी’, ‘अगं आई अहो आई’ या मराठी वेब सिरीज ही जिओ स्टुडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
तर हिंदीतील ‘डंकी’, ‘ब्लडी डॅडी’, ‘भेडिया २’, ‘अनटायटल’, ‘स्त्री २’, ‘सेक्शन ८४’, ‘हिसाब बराबर’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘ब्लॅकआउट’, ‘मुंबईकर’, ‘द स्टोरीटेलर’, ‘धूम धाम’ हे सिनेमे आणि ‘लाल बत्ती’, ‘रफूचक्कर’, ‘बजाओ’, ‘द मॅजिक ऑफ शिरी’ या वेब सिरीजचा समावेश आहे.
रिलायन्स मीडिया आणि कंटेन्ट बिझनेसच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी सांगितले की, “जुन्या भारताची नव्या भारताशी भेट घडविण्याचा उद्देश समोर ठेवून या शंभर गोष्टींचा चित्रपट आणि वेब मालिकेच्या माध्यमातून प्रस्तुती आणि निर्मिती करीत आहोत. तर सध्याच्या डिजिटल युगात कथानक केंद्रस्थानी ठेवून भारतातील, भारतासाठी आणि भारताकडून आलेल्या कथा प्रेक्षकांसमोर सादर करणे हा आमचा उद्देश आहे.”
हे देखील वाचा : या एका प्रश्नामुळे किशोरी आणि दीपक वीज अडकले लग्नबंधनात…
जिओ स्टुडिओजचे मराठी आशय प्रमुख निखिल साने यांनी सांगितले की, “भारताच्या कानाकोपऱ्यात विविध भाषांमध्ये गोष्टी दडल्या आहेत, त्या या माध्यमातून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मराठी भाषेची गोडी, संस्कृती आणि कला देशभरात पोहोचावी हा आमचा उद्देश आहे.” तसेच भारतातील प्रत्येक भाषा, संस्कृती यांची गोष्ट मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचे जिओ स्टुडिओजच्या वतीने सांगण्यात आले आहे.