भारतातील ग्लोबल स्टारपैकी एक म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकाने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूड मध्येही चांगलंच नाव कमावलं आहे. तर अशा या देसी गर्ल प्रियांकाने जगभरातील अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत.
प्रियांकाने आतापर्यंत सिनेमे आणि वेबसिरीजच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत. ती प्रत्येक वेळेस तिच्या पात्राला योग्य न्याय देत असते. सध्या ती ‘सिटाडेल’ या आगामी वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
सिटाडेलच्या प्रमोशनसाठी ती अनेक ठिकाणी उपस्थित राहताना दिसत आहे. तसेच ती अनेक मुलाखती सुद्धा देत आहे. यावेळी प्रियांकाने ती साकारत असलेल्या भूमिकेमुळे तिच्या घरातील होणाऱ्या वागणुकीतील बदल आणि ते पाहून तिच्या आईचा मिळालेला ओरडा, यावर तिने भाष्य केले आहे.
२००४ साली प्रियांकाने ‘ऐतराज’ हा सिनेमा केला होता. ज्यात तिने सोनिया कपूर ही नकारात्मक भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या कालावधीत ती तिच्या घरातही प्रियांका ऐवजी सोनिया म्हणूनच वावरत होती. त्यामुळे काहीवेळा तिला तिच्या आईचा ओरडा ही मिळे.
नुकतीच तिने एक मुलखात दिली, त्यात तिला विचारण्यात आले की, “पात्रात किंवा भूमिकेत शिरणे कठीण आहे की त्यातून बाहेर पडणे?” यावर उत्तर देत प्रियांका म्हणाली की, “पात्रात उतरणे कठीण आहे. मी कोणतीही पद्धत ठरवून अभिनय करत नाही. एकदा माझ्याबरोबर असं घडलं होतं आणि त्यावेळी आई म्हणालेली की तू माझ्या घरी येत असशील तर या पात्रातून बाहेर ये.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “मी सोनियाच्या पात्रासारखी हळू चालत असे. मी हळूच बोलायचे. मी स्टाइलने कॉफी उचलायचे आणि हळूच वर बघायचे. माझ्या आईने माझा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, जेणेकरून मी घरी कशी वागते हे तिला मला सांगता येईल. एकदा आई म्हणाली, ‘हॅलो इथे (घरात) कॅमेरा नाही. त्यामुळे घरात असल्यासारखं वाग.’ त्यावेळी माझ्याबरोबर जे घडलं ते खूप मजेदार होतं. मला वाटलं मी काय करतेय? पण मी खूप लहान होते आणि माझ्या पात्राबद्दल खूप घाबरले होते. त्यामुळे मी त्या कॅरेक्टरमध्येच घरी यायचे.”