मागील काही दिवसांपासून बहुचर्चित असलेला रिॲलिटी शो म्हणजे ‘जाऊ बाई गावात’ (Jau Bai Gavaat). एक नवखा आणि आगळा-वेगळा विषय घेऊन हा शो तमाम मराठी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आला.
जाऊ बाई गावात या शोचे हे पहिलेच पर्व असले तरी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांमध्ये या शोसाठी प्रचंड उत्सुकता होती. पण आज या उत्सुकतेचं पारडं खूपचं जड झालंय. त्याचे कारण म्हणजे या शोचा आज म्हणजेच ११ फेब्रुवारी २०२४ रोजी ग्रँड फिनाले पार पडणार आहे. तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या शोने सर्वांचेच मन जिंकले. मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा परदेशात राहून दैनंदिन जीवनात सर्व सुखसोयींसह ऐशो-आरामात जगणाऱ्या काही मुली एका छोट्याशा खेडेगावात येऊन स्वतःचा टिकाव कसा लावतात यावर हा संपूर्ण कार्यक्रम आधारित असून हा नवा विषय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
जाऊ बाई गावात या शोमुळे गावापासून लांब असणाऱ्यांची पुन्हा एकदा गावच्या मातीशी नाळ जोडली गेली आहे. या गावरान शोच्या सूत्रसंचालनाची धुरा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता हार्दिक जोशी याने सांभाळली. हार्दिकसह हे पहिले पर्व गाजले ते नानाढंगी स्पर्धकांमुळे, तसेच त्यांना दरदिवशी दिल्या गेलेल्या मोहिमांमुळे आणि खासकरून उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या आणि सहभागी होणाऱ्या बावधन गावच्या गावकऱ्यांमुळे.
अंकिता मेस्त्री, संस्कृती साळुंके, श्रेजा म्हात्रे, रमशा फारुकी, रसिका ढोबळे या सर्व मुलींनी या पहिल्या पर्वात मोहिमा जिंकत आणि प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवत शेवटच्या आठवड्यात स्थान मिळवले. आज संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत जाऊ बाई गावातचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे फक्त बावधन गावातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात महाअंतिम सोहळ्यासाठी उत्साहाचे वातावरण आहे.
महाअंतिम सोहळ्यात या पाच स्पर्धकांचा आजवरचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. तसेच यावेळी सर्वांचे दमदार परफॉर्मन्स देखील पाहायला मिळणार आहेत. तर या महाअंतिम सोहळ्याला खूपच खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाअंतिम सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेते महेश मांजरेकर येणार आहेत. या दरम्यान सोनाली उत्साहाने सहभागी होत सर्व स्पर्धकांना एक मजेशीर टास्क देणार आहे, हा टास्क नक्की काय असेल? कसा असेल? याची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहे. तसेच महेश मांजरेकर येणार म्हणजे ते स्पर्धकांची शाळा घेणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
आता संध्याकाळी ७ वाजता म्हणजेच फक्त काहीच तासांत जाऊ बाई गावात या शोच्या पहिल्या पर्वाची विजेती घोषित होणार आहे. त्यामुळे साऱ्यांच्याच नजरा घड्याळाच्या काट्यावर अन् शोवर खिळल्या आहेत.
Read More : ‘रसिका वेंगुर्लेकर’च्या नवऱ्याने माऊ म्हणजेच बायकोसाठी केली खास पोस्ट…