भारतातील सुप्रसिध्द गायक सोनू निगम, लकी अली, गायिका फाल्गुनी पाठक यांना चित्रपटांसह स्वतःचे स्वतंत्र अल्बम यातून खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. लोकप्रिय गायक आणि संगीतकार डॉ. पलाश सेन यांना देखील यातूनच नवी ओळख मिळाली.
युफोरिया (Euphoria) रॉक बँड फेम गायकाने ९०च्या दशकात तरुणांच्या मनावर जादू केली होती. तसेच त्यांच्या जबरदस्त आणि सुमधुर आवाजाने त्यांनी चाहत्यांचे मन जिंकले आहे. ‘कभी आना तु मेरे गली’, ‘मायरी’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली गाणी. तर त्यांनी क्वचितच बॉलिवूडसाठी काही गाणी गायली आहेत.
पलाश सेन यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बॉलिवूडमध्ये कमी गाण्यांचं प्रमाण आणि स्वतंत्र कलाकार असण्याचे फायदे तोटे यावर ते स्पष्टपणे बोलले. तेव्हा ते म्हणाले की, “म्युझिक माफिया आहेतच, आपल्याकडे म्युझिक इंडस्ट्रीकडे स्वतंत्रपणे कुणीच बघत नाही. आपल्याकडे एक चित्रपटसृष्टी आहे आणि म्युझिक इंडस्ट्री तिचा एक छोटासा भाग आहे. त्यातली काही एक दोन म्युझिक लेबल्स (कंपन्या) आहेत ज्यांचं या संपूर्ण इंडस्ट्रीवर वर्चस्व आहे, ज्याला माफिया असं म्हणतात. या क्षेत्रात स्वतंत्रता नाही. संपूर्ण इंडस्ट्रीची सूत्रं काही एक दोन लोकांच्याच हातात असल्याने त्यात कल्पकता कमी झाली. तीच गाणी, तीच चाल, तेच शब्द, तोच आवाज कारण म्युझिक लेबल्सना त्यांना मार्केट करायचं आहे. यामुळे एका पॉइंटनंतर ओरिजिनल गाणी बनणं बंद झालं, अन् आता तर रिमेकचा जमाना सुरू आहे.”
तसेच पलाश सेन यांनी सांगितले की, “यूट्यूब हे स्वतंत्र कलाकारासाठी, गायकांसाठी वरदान आहे पण आता त्यालासुद्धा फिल्म इंडस्ट्रीने विकत घेतलं आहे. फक्त यूट्यूबच नव्हे तर सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांनी विकत घेतले आहेत. जशी तुम्हाला लोकप्रियता मिळायला सुरुवात होते तसे हे तुमच्याकडून पैसे उकळायला लागतात. पहिलं गाणं, व्हिडिओ तुमचा चांगला चालतो, पण मग नंतर या म्युझिक माफियाला दक्षिणा दिल्याशिवाय तुमची कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणार नाही हे सत्य आहे.”
अशाप्रकारे त्यांनी या मुलाखतीत म्युझिक माफिया आणि इंडस्ट्रीत होणाऱ्या एकूण कारभाराबद्दल खुलासा केला आहे.