मराठी सिनेसृष्टीतील कलरफुल अभिनेत्री म्हणजे ‘पूजा सावंत’. पूजा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकताच तिचा मुसाफिरा हा सिनेमा प्रदर्शित झाला तर आता पुन्हा ती तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आली आहे.
दगडी चाळ, भेटली तू पुन्हा, चीटर, क्षणभर विश्रांती, बोनस यांसारख्या अनेक मराठी सिनेमातून पूजाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. तसेच जंगली साख्या हिंदी चित्रपटात देखील पूजा झळकली आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. म्हणून प्रत्येकाला पूजा रुपेरी पडद्यावर कधी झळकणार याचीच उत्सुकता असते. पूजाने २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘जंगली’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. तर त्यानंतर आता पुन्हा एकदा पूजा बॉलिवूडच्या सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे तिचे चाहते प्रचंड आनंदित झाले आहेत.
लवकरच पूजाचा ‘क्रॅक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये पूजा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता ‘विद्युत जामवाल’सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पूजाने नुकतीच तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये ती विद्युत जामवालसोबत मस्त पोज देऊन काढलेला फोटो शेअर केला. त्यानंतर आता तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला, ज्यात ती विद्युतसोबत एका जबरदस्त गाण्यावर थिरकताना दिसली. क्रॅक या आगामी सिनेमातील या दोघांचं ‘रॉम रॉम’हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या दोघांचा हा नवा सिनेमा येत्या २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
क्रॅक या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना पूजा आणि विद्युत यांची केमिस्ट्री पाहता येणार आहे. या आधी पूजाने जंगली या सिनेमात सुद्धा विद्युतसोबतच स्क्रीन शेअर केली होती. त्यामुळे चाहते पुन्हा एकदा हीच जोडी स्क्रीनवर पाहायला प्रचंड उत्सुक झाले आहेत. तर आता या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना किती आवडेल हे पाहणे उस्तुकतेचे असणार आहे.
हे देखील वाचा: पुन्हा एकदा एकत्र प्रवास होणार; २० वर्षांनी आणखी एक नवस पूर्ण होणार…
काही दिवसांपूर्वीच पूजाने तिच्या चाहत्यांना साखरपुड्याची घोषणा करत सुखद धक्का दिला. तिने तिच्या इंस्टाग्रामवर जोडीदारासोबतचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली. आता सध्या पूजाच्या लग्नाचा विषय देखील चांगलाच चर्चेत आहे. २८ नोव्हेंबर रोजी सिद्धेश चव्हाण सोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली देत त्यांचा साखरपुडा झाल्याची बातमी देखील दिली. तर मागील काही दिवसांत दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, ती लवकरच सिद्धेशसोबत लग्नगाठ बांधणार आहे.