आज ५ फेब्रुवारी रोजी ६६ वा ‘ग्रॅमी २०२४’ हा पुरस्कार सोहळा पार पडला. संगीत क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि मानाचा पुरस्कार म्हणून ‘ग्रॅमी’ पुरस्काराकडे पहिले जाते. या पुरस्काराची जगभरातील संगीतप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. काही दिवसांपासून या पुरस्कार सोहळ्याकडे जगभरातील सगळ्यांचे लक्ष लागले होते. या पुरस्काराचे यंदाचे हे ६६ वे वर्ष आहे.
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात आपल्याला एखादा तरी पुरस्कार मिळावा अशी प्रत्येक संगीतकाराची इच्छा असते. तशीच संगीत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आपल्या भारतीय कलाकारांची देखील असते. पण यंदा मात्र या पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकारांनी बाजी मारली. जगभरातील सगळे संगीतकार हा पुरस्कार मिळवण्यासाठी अपार कष्ट करतात. तर या वर्षी ज्येष्ठ तबला वादक झाकीर हुसैन आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारताची मान उंचावली आहे.
शंकर महादेवन यांना ‘शक्ती’ बँडच्या ‘दिस मोमेंट’ या अल्बमसाठी ‘सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम’चा पुरस्कार मिळाला आहे. गिटारिस्ट जॉन मॅकलॉग्लिन, उस्ताद झाकिर हुसैन, गायक शंकर महादेवन, तालवादक व्ही. सेल्वागणेश आणि व्हायोलिनिस्ट गणेश राजगोपालन यांनी सर्वांनी मिळून हे गाणं संगीतबंध केले आहे. त्यामुळे आजचा हा दिवस सिनेसृष्टीतील प्रत्येकासह सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण आहे.
View this post on Instagram
तसेच ‘ग्लोबल म्यूझिक परफॉर्मेंस’या कॅटेगरीमध्ये झाकीर हुसैन, बेला फेक, एडगर मेयर यांना ‘पश्तो’साठी पुरस्कार मिळाला. या सोबतच ‘बेस्ट कंटेम्परेरी इन्स्ट्रमेंटल अल्बम’या कॅटेगरीमध्ये देखील बेला फेक, झाकीर हुसैन, एडगर मेयर, राकेश चौरसिया यांना ‘एज वी स्पीक’साठी पुरस्कार मिळाला. शंकर महादेवन, झाकीर हुसैन आणि राकेश चौरसिया यांनी भारतीय सिनेसृष्टीत मानाचा तुरा रोवला आहे. ग्रॅमी जिंकल्यानंतर सोशल मीडियावर पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सर्वांचे भरभरून कौतुक होत आहे.
हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जगभरातील अनेक दिग्गज संगीतकार आणि गायकांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात अमेरिकन गायिका मायली सायरलसा हिला तिच्या करियरमधील पहिला ‘ग्रॅमी’ पुरस्कार मिळाला. अमेरिकन गायिका ‘टेलर स्वीफ्ट’ ही दरवर्षीच ‘ग्रॅमी’मध्ये बाजी मारताना दिसून येते, या वर्षी तर तिने तब्बल ४ पुरस्कारांवर स्वतःचं नाव कोरले आहे. तसेच प्रसिद्ध कॉमेडीयन ट्रेवर नोआने यंदा देखील ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. गेले चार वर्ष या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी तेच पार पाडली आहे.