मराठी सिनेसृष्टीत कायम एकामागोमाग एक दमदार सिनेमांची सरबत्ती सुरूच असते. सारेजण नवीन विषय, नवा चेहरा आणि नवा संदेश घेऊन रसिक प्रेक्षकांसमोर येत असतात. तर काहींना जुन्या सिनेमाचे रिमेक बनवण्यात अधिक रस असतो. यामुळे काही वर्षांपूर्वी पाहिलेले सिनेमे नव्या रुपात पाहायला प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. तर आता पुन्हा एकदा अशाच एका गाजलेल्या मराठी सिनेमाचा रिमेक होत आहे, तो सिनेमा म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha).
असा एकही मराठी प्रेक्षक नसेल ज्याने नवरा माझा नवसाचा हा मराठीतील सुपरहिट सिनेमा पाहिला नसेल. २००४ साली प्रदर्शित झालेला नवरा माझा नवसाचा हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत इतका गाजला की, हा सिनेमा किंवा या सिनेमातील डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या केवळ लक्षात आहेत असं नाही तर हा अख्खाच्या अख्खा सिनेमा अक्षरशः प्रेक्षकांच्या हृदयावर कोरला आहे. या सिनेमाची क्रेझ तेव्हाच होती असंही नाही, आजची प्रत्येक नवी पिढी हा सिनेमा आवर्जून पाहत आहेत. प्रेक्षक आजही हा सिनेमा वारंवार पाहत आहेत अन् प्रत्येकवेळी सिनेमाला पसंतीही देत आहेत.
नुकताच नवरा माझा नवसाचा या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली. ज्येष्ठ अभिनेते जयंत वाडकर यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली. जयंत वाडकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा करताना ‘नवरा माझा नवसाचा २’ सिनेमाच्या क्लॅपर बोर्डचा फोटो शेअर केला. ही पोस्ट शेअर करताच अवघ्या काही क्षणांत ही आनंदाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्याचे कारण तर आपणासर्वांस ठाऊकच आहे. या सिनेमाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे सिनेमाची वार्ता समोर येताच सर्वांना आनंद झाला आहे.
View this post on Instagram
नवरा माझा नवसाचा २ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून या सिनेमाच्या शूटिंगला उद्यापासून म्हणजेच ५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात होणार आहे. जयंत वाडकर यांनी नवरा माझा नवसाचा २ सिनेमाच्या क्लॅपर बोर्डचा फोटो शेअर करत लिहिले की, “नवरा माझा नवसाचा २ सिनेमाचे शूटिंग उद्यापासून सुरु होत आहे. तुमचे आशीर्वाद पाठीशी राहू द्या.” २००४ साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा दुसरा भाग तब्बल २० वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे मराठी रसिक प्रेक्षक खुश आहेत. जयंत वाडकर यांच्या या पोस्टवर अनेक कलाकार आणि खास करून सिनेमाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा सचिन पिळगांवकर यांच्याकडे आहे.
नवरा माझा नवसाचा या सिनेमात आपण सर्वांनी सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जॉनी लिव्हर, वैभव मांगले, अतुल परचुरे, जयंत वाडकर, मधुराणी प्रभुलकर अशा दमदार अन् तगड्या स्टार कास्टने रंगलेला सिनेमा पाहिला. पण आता नवरा माझा नवसाचा २ साठी कोणते कलाकार पडद्यावर झळकणार याबाबत प्रेक्षकांमध्ये भारीच उत्सुकता आहे. तर आता कोणता नवस पूर्ण होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच आधीच्या सिनेमातील भन्नाट कलाकार पुन्हा एकदा पडद्यावर दिसावे अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली.