छोट्या मुलांचा मोठा शो म्हणजेच सारेगमप लिटिल चॅम्प्स. या लोकप्रिय शोच्या पहिल्याच पर्वातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले आणि तमाम मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे कलाकार म्हणजेच मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathmesh Laghate).
‘आमचं ठरलं’ असं म्हणत या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. मुग्धाच्या आणि प्रथमेशच्या लग्नाची सर्व आतुरतेने वाट पाहत असताना मोठ्या बहिणीचे म्हणजेच मृदुलचे लग्न झाले. त्यापूर्वी प्रथमेश आणि मुग्धाचा ५ नोव्हेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने साखरपुडा झाला. त्यानंतर काहीच दिवसांत मराठमोळ्या पद्धतीत आणि रितीरीवाजाप्रमाणे या दोघांच्या लग्नाचा सोहळा पार पडला. या दोघांचा हा लग्न समारंभ २१ डिसेंबर २०२३ रोजी मुग्धाच्या सासरी म्हणजेच चिपळूण येथे झाला.
लहानपणापासूनच या दोघांना प्रचंड मोठा चाहतावर्ग लाभला. त्यामुळे मुग्धा आणि प्रथमेशचे लग्न सोशल मीडियावर चांगलेच गाजले. त्यात त्यांच्या लग्नासाठी सिनेसृष्टीतील असंख्य कलाकार मंडळी उपस्थित होती, त्यामुळे काही दिवस सोशल मीडियावर फक्त नी फक्त मुग्धा प्रथमेशचीच चर्चा सुरु होती. आता या दोघांनी आपला सुखाचा संसारही थाटला आहे. ते दोघेही त्यांच्या रोजच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. लग्नानंतर दोघंही काहीच दिवसांत कामावर रुजू झाले. त्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी गाण्याच्या कार्यक्रमानिमित्त त्यांचे एकत्र दौरे सुरु झाले.
आता मुग्धा आणि प्रथमेशची स्वारी थेट कोकणात पोहोचली आहे. पण कोकणात कोणत्याही गाण्याच्या कार्यक्रमासाठी नाहीतर ते दोघे मुग्धाच्या माहेरी गेले आहेत. आपल्या सर्वांची ही लाडकी जोडी सध्या अलिबागमध्ये समस्त वैशंपायन कुटुंबियांसोबत मजा-मस्ती करत आहे. मुग्धा तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माहेरी गेली आहे. या खास क्षणी वैशंपायन यांच्या जावयाचे म्हणजेच प्रथमेशचे देखील चांगलेच कोड-कौतुक झाले. यावेळी मुग्धाचे सर्व भावंडं देखील एकत्र आले होते, तेव्हाचा त्यांचा फोटो अन् खास मेजवानीचे फोटो देखील मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केले. यात आंबोळी-बटाट्याजी भाजी, सांभार-चटणी अशा साग्रसंगीत दाक्षिणात्य जेवणाच्या ताटाचा फोटो देखील होता. लग्नानंतर प्रथमच मुग्धा आणि प्रथमेश मुग्धाच्या गावी गेल्याने त्यांच्या आनंदाचा एक वेगळाच सोहळा सोशल मिडीयावर पाहायला मिळाला आहे.
तसेच मुग्धासह तिची थोरली बहिण मृदुल देखील या जंगी सेलेब्रेशनसाठी अलिबागमध्ये उपस्थित होती. त्यामुळे सध्या मुग्धा आणि प्रथमेशच्या कोकण दौऱ्याची चर्चा सुरु आहे.