मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी इंस्टाग्रामवर आपल्या प्रेमाची कबुली देत आता सात वचन घेऊन या दोघांनी लग्नगाठ बांधली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी २१ डिसेंबरला चिपळूण येथे मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीनुसार थाटामाटात लग्न केले. यावेळी मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, तर प्रथमेशने लाल रंगाच्या कुर्त्यावर पुणेरी पगडी असा लूक केला होता. पैठणी साडी, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने या लूकमध्ये मुग्धा फारच सुंदर दिसत होती. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक गायक व कलाकारांनी हजेरी लावली होती.
View this post on Instagram
मुग्धा आणि प्रथमेशने सोशल मिडीयावर आपल्या लग्न समारंभाचे फोटोज आणि व्हिडीओ शेअर केले. तेव्हापासून इंस्टाग्रामवर या दोघांचीच हवा आहे असं बोलायला हरकत नाही. मात्र आता अजून एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तो व्हिडीओ म्हणजे मुग्धाच्या गृहप्रवेशाचा. सासरी मुग्धाचं अगदी जंगी स्वागत करण्यात आलं. फुलांची सजावट, अंगणात नातेवाईक मंडळी आणि बरीच धमाल-मस्ती मुग्धाला तिच्या गृहप्रवेशाच्यावेळी अनुभवायला मिळाली. शिवाय या व्हिडीओमध्ये या दोघांचा उखाणा चर्चेचा विषय ठरला.
दोघांच्या या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केले, तर काहींना मुग्धा-प्रथमेशने घेतलेला उखाणा अधिक आवडला. मुग्धाची बहिण मृदुलही आपली बहिण सासरी जाताना बघून भावनिक झाली. यावेळी मुग्धाच्या व्हिडीओवर बहिणीने भावुक कमेंट केली. “मी रडत आहे” असं तिने म्हटलं. याच महिन्यामध्ये मुग्धाची बहीण मृदुलचाही विवाहसोहळा पार पडला.
View this post on Instagram
“कपात ओतला चहा चहाखाली ठेवली बशी, मुग्धा माझी गरीब गाय, बाकी सगळ्या मारक्या म्हशी” असा गमतीशीर उखाणा प्रथमेशने मुग्धासाठी घेतला. तर उखाणा घेण्यामध्ये मुग्धाही मागे राहिली नाही. तिनेही यामध्ये बाजी मारली. “मंगळसूत्राच्या दोन वाट्या, म्हणजे माहेरची व सासरची खून, प्रथमेशच नाव घेऊन कलाश्रीमध्ये गृहप्रवेश करते, नीना आणि उमेश लघाटे यांची सून” हा उखाणा मुग्धाने घेतला.