देसी गर्ल म्हणून जगभरात ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. नवनवीन सिनेमे आणि वेब सीरिजच्या माध्यमातून ती सतत प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. प्रियांकाने फक्त बॉलिवूड मध्येच नाही तर हॉलिवूड मध्येही चांगलचं नाव कमावले आहे.
प्रियांका सध्या तिच्या सिटाडेल या आगामी वेब सिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. तर सध्या या सीरिजच्या निमित्ताने ती अनेक मुलाखती देताना दिसत आहे. यावेळी तीने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला. जेव्हा प्रियांका अमेरिकेत पहिल्यांदा राहायला गेली होती, तेव्हा नेमकं अस काय घडलं की प्रियांका इतकी घाबरली होती.
प्रियांकाने अमेरिकेतील या भीतीदायक अनुभवाबद्दल पहिल्यांदाच एकदम खुलेपणाने भाष्य केले आहे. तेव्हा तिने सांगितले की जेव्हा ती अमेरिकेत गेली तेव्हा ती शिक्षणासाठी गेली होती. म्हणजे तेव्हा ती किशोरवयात होती, त्यामुळे परदेशात एकटीने जाऊन राहणं नक्कीच सोप्पं नाही. तिथे जाऊन स्थिरस्थावर होईपर्यंत ती कित्येक दिवस भीतीखाली जगत होती.
नवीन जागा म्हण्टल्यावर तिथे रुळायला तर वेळ लागणारच, तसाच प्रियांकालाही लागला. नवीन जागेची भीती, एकटेपणा यामुळे तिला सुरुवातीच्या काही दिवसांत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे. तसेच प्रियांकाने सांगितले की, ‘सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी माझे दुपारचे जेवण बाथरूममध्ये करायचे. कारण मी खूप घाबरले होते. कॅफेटेरियापर्यंत कसे जायचे आणि जेवण कसे घ्यायचे हे मला माहीत नव्हते. मी पटकन जवळच्या स्टॉलमधून जेवण आणायचे आणि बाथरूममध्ये गुपचूप खात होते.”
प्रियांकाच्या आयुष्यातील हा खडतर अनुभव ऐकून उपस्थित प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्काच बसला. पण प्रियांकाचे तेही दिवस गेले आणि आता लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे.