आपला आवडता अभिनेता, अभिनेत्री किंवा कोणत्याही क्षेत्रातील आपल्या आवडीचा एकतरी असा व्यक्ती असतो जो आपल्याला आदर्श वाटतो. त्यामुळे त्या व्यक्तीशी पहिली भेट जणू आपल्या मनावरच कोरली जाते. अशीच आपल्या लाडक्या नटाची आठवण अभिनेता ऋषी शेलार (Hrishi Shelar) याने सर्वांसोबत शेअर केली.
आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजेच मामा म्हणजेच अशोक सराफ यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यात फक्त सर्वसामान्य रसिक प्रेक्षकच नाही तर आपल्या सर्वांचे सध्याचे लोकप्रिय कलाकार देखील लहानपणापासून त्यांचे खूप चाहते आहेत. त्यामुळे अनेकजण आपआपल्या आठवणी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तर आता नेमकं ऋषीने देखील अशोक मामांसोबतची पूर्वीची म्हणजेच पहिल्या भेटीची आणि आत्ता नुकतीच झालेल्या खास भेटीची कहाणी सांगितली.
पोस्ट करत पूर्वीच्या आठवणींना उजाळा देत त्याने लिहिले की, “दहा वर्षांपूर्वी आपल्या जवळच्या एका शहरात आपल्या सगळ्यात लाडक्या नटाचं नाटक आलेलं असतं. आपण आपल्या जिगरी दोस्ताबरोबर आपल्या ‘त्या’ आवडत्या नटाचे डायलॉग्ज म्हणत म्हणतच दीड-दोन तासाची रपेट करून नाटकाला पोहचतो. पडदा उघडतो आणि ‘ते’ स्टेजवर येतात, आपण त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहतो.. आणि पाहतच राहतो. हाच तो नट ज्यांनं आपलं बालपण सुंदर केलं, आनंदी केलं.. हाच तो नट जो आपल्याला एवढा आपलासा वाटतो, जवळचा वाटतो की तो आपल्या स्वप्नात येतो. आपण बुचकळ्यात.. हे सत्य आहे की तेच स्वप्न कंटिन्यू होतय?”
पुढे त्याने लिहिले की, “नाटक संपल्यावर बॅक स्टेजला मोठी रांग त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी. आपणही त्या गर्दीत सामील होतो, अर्धा तास रांगेत थांबून शेवटी आपल्या सुप्परस्टारच्या जवळ पोहोचल्यावर अचानक काहीतरी वाटतं आणि आपण फोटो न काढताच बाजूला होतो रांगेतून आणि दोस्ताला कानात म्हणतो ‘मला गर्दी म्हणून नाही भेटायचं यांना. मी भेटणार नक्की, पण आत्ता असं नाही.’ बॅक स्टेजला घुटमळत आमच्या भेटीचा तो क्षण आपण लांबणीवर टाकून देतो, अनिश्चित काळासाठी. आपण परत बुचकळ्यात.. हा शहाणपणा की मूर्खपणा?”
तर आत्ताच्या इतक्या वर्षांनी घडलेला प्रसंग सांगताना त्याने लिहिले की, “कट टू.. बरोब्बर दहा वर्षांनी, आता स्टेजवर आपल्या ‘त्या’ सुप्परस्टारच्या हस्ते आपला सत्कार होतो, ते आपल्या कामाचं कौतुक करत असतात आणि त्यांचे शब्द स्लोमोमध्ये आपल्या कानावर हळुवार मोरपिसासारखे..! अगदी तसंच जसं आपण अनेकदा आपल्या स्वप्नात पाहिलंय. आपला आपल्या कानांवर-डोळ्यांवर विश्वास बसत नाही आपण थेट त्यांचे पाय धरतो, स्लोमोमध्येच. बॅकस्टेजच्या रांगेतला मी, स्टेजवरच्या माझ्याकडे पाहून हसतो; आणि आपण परत एकदा कंटिन्युटीमध्ये बुचकळ्यात.. हे सत्य आहे की तेच स्वप्न कंटिन्यू होतय?”
ऋषी सध्या झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.