मराठी रंगभूमीपासून सुरु झालेला प्रवास केवळ रंगभूमीपर्यंत सीमित न राहता मराठी सिनेसृष्टीतील नाटक, मालिका आणि सिनेमा यांतून तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अष्टपैलू अभिनेते म्हणजे ‘अशोक सराफ’ (Ashok Saraf).
नुकत्याच पार पडलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना २०२३ चा कला विश्वातील मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुरुवारी, २२ फेब्रुवारी २०२४ रोजी हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, साडे माडे तीन, बाळाचे बाप ब्रम्हचारी, आम्ही सातपुते, नवरा माझा नवसाचा यांसारख्या अनेक सिनेमातून अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या निरनिराळ्या छटांमधून प्रेक्षकांवर आपली जादू कायम ठेवली.
अशोक सराफ यांना भूषण पुरस्कार मिळण्याआधी त्यांनी त्यांचे मत मांडले. तेव्हा ते म्हणाले की, “या क्षणाला मला नंबर १ झाल्यासारखं वाटतंय. आपल्या कार्यभूमीत असं कौतुक होणं ही प्रत्येकासाठीच खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या आजच्या लूकचं पूर्ण श्रेय निवेदिताचं आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा प्रसंग आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा सत्कार आहे असं मी समजतो.” या सुवर्णक्षणी अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ देखील उपस्थित होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या की, “आमचे सर्व कुटुंबीय आज आमच्याबरोबर आहेत. माझ्या माहेरचे-सासरचे असे सगळेजण या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आहे. कुटुंबीयांसमोर अशोक हा पुरस्कार स्वीकारत असल्याने मला फार आनंद होतो आहे. काही दिवसांपूर्वी हा पुरस्कार जाहीर झाल्यावर प्रत्येकजण आनंदी होते, मला वाटतं हेच अशोकचं सर्वात मोठं यश आहे.
View this post on Instagram
महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार स्वीकारल्यावर मंचावर असताना अशोक मामा म्हणाले की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, दिपक केसकर, मनिषा कायंदे या सगळ्यांना मी अभिवादन करतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठा व एक नंबरचा पुरस्कार आज तुम्ही मला प्रदान केलात याचा मला सर्वाधिक आनंद होत आहे. ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो, जी माझी कर्मभूमी आहे आणि याठिकाणीच आज माझा सत्कार व्हावा यासारखी मोठी गोष्ट दुसरी कुठलीच नाही. महाराष्ट्र शासनाचे यासाठी मी मनापासून अभिवादन करतो. कारण, याआधी ज्या लोकांना हा पुरस्कार प्राप्त झालाय ती यादी एवढ्या मोठ्या लोकांची आहे की, त्यात मला नेऊन बसवलं ही माझ्यासाठी कधीही न विसरण्यासारखी गोष्ट आहे.”
मराठी सिनेसृष्टीबद्दल सांगताना आणि आजवरच्या कारकीर्दीवर नजर फिरवत अशोक सराफ म्हणाले की, “आता एकंदर माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं, तर जवळपास ५० वर्षांची संपूर्ण कारकीर्द आहे. आता खरंतर सगळं आठवतही नाही. पण, या संपूर्ण प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मदत केली. मग ते दिग्दर्शक असो किंवा माझ्याबरोबर काम करणारे लहान लहान कामगार, तंत्रज्ञ कोणीही असूद्या… या सगळ्यांनी मला कळत नकळत नेहमीच मदत केली. त्यांनी मला सतत पाठिंबा दिला नसता, तर मी आज या पदाला पोहोचलो नसतो. सगळ्यात शेवटी तुम्ही… म्हणजे माझा प्रेक्षकवर्ग. या महाराष्ट्राला लाभलेला प्रेक्षकवर्ग अतिशय बुद्धिमान आहे. आवडलं तर डोक्यावर घेणारा नाहीतर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. त्यामुळे अशा लोकांमध्ये काम करणं ही तारेवरची कसरत आहे. आपण प्रेक्षकांसमोर काहीही सादर करू शकत नाही. नेहमी सादरीकरण करताना आम्हाला प्रत्येक गोष्टीचं भान ठेवावं लागतं.”
तसेच ते म्हणाले की, “ही खरंतर चांगली गोष्ट आहे कारण, आपलं काम हे समोर बसलेल्या लोकांना आवडलं पाहिजे हा दृष्टीकोन नेहमी प्रत्येकाने बाळगला पाहिजे. मी सतत तोच दृष्टीकोन घेऊन काम करत आलो आहे. कारण, कलाकारासाठी प्रेक्षक हा सर्वात श्रेष्ठ असतो. जर दाद द्यायला तुम्ही नाही आलात, तर आम्ही काय करणार? मग, आम्ही घरीच…त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुमचे हे उपकार मी कधी फेडेन याबद्दल मला काहीच माहिती नाही. किंबहुना तुमचे हे उपकार मी फेडू देखील शकणार नाही. पण, माझ्या मनात तुमच्याबद्दलचं प्रेम सतत राहणार याबद्दल मला जराही शंका वाटत नाही. तुम्ही माझा एवढा मोठा सत्कार केलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद.”
कित्येक वर्ष मराठी सिनेमांची धुरा आपल्या खांद्यावर सहज पेलणारे आणि कायम आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या अशोक मामांनी फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही उत्तम अभिनय करत प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला. त्यांचा हा चाहतावर्ग त्यांना फक्त अशोक मामा म्हणून पुकारत नाही तर सर्वांनाच ते आपल्या घरातील सदस्याप्रमाणे भासतात. त्यामुळे त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे अशोक मामांचे चाहते आणि संपूर्ण सिनेसृष्टी आनंदात आहे. त्यामुळे सध्या त्यांच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.