“जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते कामवाल्या बायकांच्या टंचाई मुळे होईल.” असं म्हणत “नाच गं घुमा”चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.
अभिनेता आणि निर्माता स्वप्नील जोशी यांची निर्मिती असलेला “नाच गं घुमा” या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांच लक्ष वेधून तर घेतलं आणि सध्या सोशल मीडियावर याबद्दल खूप चर्चा देखील होताना दिसतात. अभिनयाच्या सोबतीने निर्मिती विश्वात स्वप्नीलचं पदार्पण नेमक कसं झालं? स्वप्नीलला निर्माता का व्हावंसं वाटलं? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे या बद्दल स्वतःच स्वप्नील सांगतो.
स्वप्नील त्याच्या निर्मिती विश्वात येण्याबद्दल सांगतो “मला निर्माता होण्याची संधी मधुगंधा आणि परेश यांच्यामुळे मिळाली. अभिनेता म्हणून अभिनय करणं कामाचा एक भाग झाला आहे पण ‘नाच गं घुमा’ सारख्या चित्रपटाची निर्मिती करणं नक्कीच सोप्पं नव्हत. चित्रपट घडवण्यासाठी त्याच्या मागे अनेक लोकांची फौज असते प्रत्येकाची खास मेहनत टीम वर्क असत आणि म्हणून माझ्या हातून या चित्रपटाची निर्मिती झाली अस मी म्हणेल. चित्रपटाचा निर्माता होणं आणि या निमित्ताने अनेक नव्या गोष्टी शिकणं हे देखील तितकच महत्त्वपूर्ण आहे. अभिनयाच्या पलिकडे जाऊन आता निर्मात्याची भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक तर आहे आणि आता चित्रपट कधी एकदा तुमच्या भेटीला घेऊन येतोय यासाठी वाट बघतोय.”
दर्जेदार स्टारकास्ट आणि बायकांची फौज असलेल्या या चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांना मोहित केलं असून आता सगळ्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता आहे. आता चित्रपटात अजून काय काय सरप्राईज बघायला मिळणार स्वप्नील या चित्रपटात ‘अभिनेता’ म्हणून दिसणार का? की फक्त निर्माता असणार? याची उत्तरं आता चित्रपटगृहात जाऊनच बघायला लागणार.
नाच गं घुमाच्या सोबतीने स्वप्नील आगामी ‘बाई गं’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. 2024 मध्ये तो अजून काय काय भूमिका साकारणार हे बघणं उत्सुकतेच ठरणार यात शंका नाही.