मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या आठवणीत राहतात त्यापैकी एक म्हणजे ‘झपाटलेला‘ हा चित्रपट १६ एप्रिल १९९३ साली प्रदर्शित झाला, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले असून अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे व दिलीप प्रभावळकर हे मुख्य भूमिकेत होते. आजही लोक या चित्रपटाची आठवण काढतात. तात्या विंचू या बोलक्या बाहुल्याचे पात्र अजरामर करणारे रामदास पाध्ये यांचे सुपुत्र सत्यजित पाध्ये यांनी आपल्या वडिलांचाच वारसा पुढे नेत बोलक्या बाहुल्यांच्या कलेला एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवलं आहे. आज जगभरात त्यांचं यासाठी कौतुक केलं जातं. याची आठवण त्यांनी एका फेसबुक पोस्ट मधून करून दिली आहे.
‘झपाटलेला’ हा मराठीतील एक कल्ट क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. २०१३ साली याचा दूसरा भाग म्हणजेच ‘झपाटलेला २’ प्रदर्शित झाला ज्यात आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मकरंद अनासपूरे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
त्यावेळेस या चित्रपटातील ‘ओम भट स्वाहा’ हा डायलॉग अतिशय फेमस झाला होता. त्यावर अनेक memes सुद्धा बनवण्यात आल्या होत्या. आत्ता सुद्धा बऱ्याचदा हा डायलॉग कोणाच्या ना कोणाच्या तोंडून ऐकायला मिळतो, प्रेक्षक आज देखील तात्या विंचूची आठवण काढतात. याच अजरामर पात्राला दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी पोस्ट सत्यजित पाध्ये यांनी लिहिली आहे. याबरोबरच त्यांनी चित्रपटाच्या सेटवरील शूटिंगदरम्यानचे काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत.
सत्यजित आपल्या पोस्टमध्ये लिहितात. “३० वर्ष… हो.. झपाटलेला ह्या सिनेमाला आज ३० वर्ष पूर्ण होत आहेत. १६ एप्रिल १९९३ ह्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुम्ही सर्वांनी त्याला आयकॉनिक बनवला…तात्या विंचू हे पात्र सुद्धा भारतीय व मराठी सिनेमाच्या इतिहासातलं एक अविभाज्य घटक बनलं. आज २०२३ साल आहे आणि आमच्या तात्या विंचूची लोकप्रियता दरवर्षी वाढतच आहे. सोशल मीडियाच्या युगात आज त्याच्यावर अनेक memes बनत आहेत. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जी मुलं १९९३ ला जन्माला सुद्धा आली नव्हती, त्यांना सुद्धा आमचा तात्या विंचू आवडतो. या निमित्ताने, आम्ही (झपाटलेला आणि झपाटलेला २ ची संपूर्ण टीम) आमच्या लाखो चाहत्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी हे घडवून आणले. आमच्या तात्या विंचूवर असेच प्रेम करत रहा. ह्या निमित्याने, झपाटलेला ह्या सिनेमाची काही पडद्यामागची छायाचित्रे आम्ही शेअर करत आहोत.”