मराठी सिनेसृष्टीत आजवर असंख्य सिनेमे आले आणि गेले. पण काही सिनेमे मात्र अनेक वर्षांनंतरही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकी आपल्या सर्वांचा आवडता एक सिनेमा म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी.’
अशी ही बनवाबनवी या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीचा एक मोठा काळ गाजवला. तसेच या सिनेमाने भारतीय सिनेसृष्टीत मराठी सिनेसृष्टी उंचावर नेऊन ठेवली हे नक्की. अशोक सराफ, निवेदिता सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे आणि सुधीर जोशी या अफलातून कलाकरांच्या उत्कृष्ट कलाकृतीमुळे तसेच तितक्याच जबरदस्त कथा, संवाद आणि गाण्यांमुळे हा सिनेमा आजही प्रेक्षक त्याच उत्सुकतेने पाहत असतात.
सध्याच्या रिमेकच्या ट्रेंडमध्ये या सिनेमाचा रिमेक कधी येणार याची चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली होती. तर काहींनी रिमेक नको, म्हणून खूप स्पष्टपणे सांगितले. परंतू आता या सिनेमाच्या रिमेकबद्दल अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित’ने नुकतंच भाष्य केले आहे. तेजस्विनी अभिनयासोबतच अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. तर आता तिने निर्मिती क्षेत्रातदेखील पदार्पण केले आहे. त्यानिमित्त नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तेजस्विनीला विचारण्यात आले की, “अशी ही बनवाबनवी’च्या रिमेकमध्ये अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे या प्रमुख भूमिकेत तुला कोणाला पाहायला आवडेल?”
तेव्हा तेजस्विनी म्हणाली की, “अशी ही बनवाबनवीचा रिमेकमध्ये मी सचिन पिळगावकरांच्या भूमिकेसाठी मी सिद्धार्थ चांदेकरला कास्ट करेन, कारण त्या चित्रपटात सचिन सर स्त्री वेशात इतके गोड दिसले आहेत. तितकाच तो ही दिसेल कारण सिद्धार्थ चिकना आहे आणि तो स्त्री वेशात खूप गोड दिसेल. त्या पात्रात तो खूप छान दिसेल असं मला वाटतं. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भूमिकेसाठी मी अभिनयलाच कास्ट करेन कारण तो ते खूप छान पद्धतीने वठवू शकेल आणि अशोक सराफ यांच्या भूमिकेसाठी मी अमेय वाघला कास्ट करेन.”
तसेच पुढे ती म्हणाली की, “मुळात हे जे ब्लॉकबस्टर सिनेमे आहेत ते पुन्हा होऊ नयेत. कारण त्याची मजा त्याच लोकांसोबत असते.” असे असले तरी आजही या सिनेमासाठी प्रेक्षकांमध्ये असलेलं वेड न संपणारं आहे.