आपण दिवसरात्र मेहनत करतो ती कशासाठी तर आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी. जेव्हा हे स्वप्न पूर्ण होतं तेव्हा मिळणारा आनंद आणि समाधान अफाट असते. असंच एक स्वप्न पूर्ण करून सध्या प्रचंड आनंदित असणारा मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता म्हणजे ‘शशांक केतकर (Shashank Ketkar).’
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून शशांक महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. या मालिकेने शशांकला एक वेगळीच ओळख मिळवून दिली हे खरं. तर आता तो ‘मुरांबा’ या मालिकेतून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे मालिका विश्वात शशांक अनेकांचा लाडका अभिनेता आहे. त्याने त्याच्या उत्तम अभिनयातून कायम चाहत्यांचे मन जिंकून घेतले. त्यामुळे त्याचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे.
शशांक कायम आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या वैयक्तिक आणि कामासंबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. त्याचे निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ त्याच्या चाहत्यांच्या कायम पसंतीस उतरत असतात. आता त्याने नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. तर ही पोस्ट पाहून सारेचजण त्याचे कौतुकही करत आहेत. ही पोस्ट शेअर करत शशांकने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. ती बातमी म्हणजे नव्या कोणत्या मालिकेची किंवा सिनेमाची घोषणा नसून त्याच्या स्वप्नपूर्तीची आहे.
शशांकने नुकतीच एक नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. आणि तीही साधी-सुधी गाडी नाही तर इलेक्ट्रिक गाडी खरेदी केली. या पोस्टमधून त्याने सांगितले की, इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याचं त्याचं स्वप्न होतं. अन् आता त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे, आणि तेही ही केवळ एका वर्षात. त्यामुळे सध्या त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत त्याच्या मनातील भावना त्याने व्यक्त केली.
View this post on Instagram
नव्या इलेक्ट्रिक गाडीचे फोटो आणि नव्या गाडी सोबतचा शशांकने स्वतःचा फोटो शेअर करत खूप सुंदर पोस्ट लिहिली. तेव्हा त्याने लिहिले की, “नवीन टेक्नॉलॉजीने मला कायमच भुरळ घातली आहे. Electric vehicle असा काही प्रकार असतो हे ज्या वयापासून मला कळू लागलं आहे तेव्हा पासून, आपण एकदा एक EV घ्यायची हे स्वप्नं होतं. मागच्या १४ वर्षात माझ्या ३ गाड्या झाल्या. पहिली मारुतीची इर्टिगा, दुसरी किया सेलटॉस आणि आता टाटा नेक्सन इलेक्ट्रिक! मागच्या वर्षी जेव्हा मी ओला इलेक्ट्रिक घेतली, तेव्हाच ठरवलं होतं की योग्य वेळं आली की पेट्रोल कारवरून मी EV car वर सुद्धा शिफ्ट होईन! आणि वर्षभरातच इव्ही कार दारात आली देखील. स्वप्न सत्यात आलं. टाटा इव्ही इंडिया अभिमान.”
शशांकच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि सिनेसृष्टीतील इतर कलाकार मंडळी आणि त्याच्या कुटुबीयांनी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.