महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण जगभरात नुकतीच जयंती साजरी करण्यात आली. तर दुसरीकडे महाराजांच्या जयंतीनिमित्त सिनेसृष्टीत चर्चा सुरू झाली ती त्यांच्यावर आधारित आणखी एका नव्या सिनेमाची.
मागील चार ते पाच वर्षांत शिवचित्रपटांची ऐतिहासिक घोडदौड पहायला मिळाली. शिवकालीन इतिहासाचा प्रभाव केवळ मराठी सिनेसृष्टीवर नाही तर हिंदी सिनेसृष्टीवरही आहे. आणि आतापर्यंतच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला.
आता महाराजांवर आधारित कोणता नवीन सिनेमा येणार याचीच प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. त्यातच शिवजयंतीच्या निमित्ताने ‘रावरंभा‘ या आगामी सिनेमाचे पोस्टर शेअर करत घोषणा करण्यात आली. त्यामुळे या सिनेमामध्ये महाराजांची भूमिका कोण साकारणार या कडे सर्वचजण नजर ठेऊन होते.
शेअर करण्यात आलेल्या पोस्टरनुसार शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा खुलासा झाला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रसिध्द अभिनेते ‘शंतनू मोघे’ यांनी साकारली होती. त्यांनी त्यांच्या अभिनय कलेने साक्षात महाराज आपल्या डोळ्यासमोर उभे केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना रावरंभामध्ये महाराजांच्या भूमिकेत पाहून चाहते फारच खूश झाले आहेत.
या भूमिकेबद्दल बोलताना शंतनू मोघे म्हणाले की, “रावरंभा हा अतिशय भव्यदिव्य आणि थक्क करणारा सिनेमा आहे. अभिनेता म्हणून मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की, रावरंभा सिनेमात मला ‘शिवाजी महाराजांची भूमिका’ साकारायला मिळतेय. ज्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाने आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, त्यामुळे अशी भूमिका साकारताना माझ्यावर मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच आहे.”
रावरंभा या सिनेमाची बांधणी पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. तर हा सिनेमा येत्या ७ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.