‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील श्वेता म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री ‘अनघा अतुल’ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तर अनघाने नुकतेचं हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे.
रंग माझा वेगळा या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत अनघाने श्वेता या खलनायिकेचे पात्र साकारले होते. खलनायिका जरी असली तरी तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.
सध्या बरेच कलाकार अभिनय क्षेत्रासोबतच स्वतःचे व्यवसाय सुरू करताना देखील पाहायला मिळत आहेत. तसेच अनघाने देखील तिचा नवा व्यवसाय थाटला आहे. तिने आता नवीन हॉटेलची सुरुवात केली. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील डेक्कन परिसरात ‘वदनी कवळ’ हे शुद्ध शाकाहारी हॉटेल सुरू केले आहे.
अनघाने तिच्या भावासोबत म्हणजेच अखिलेश भगरेसह मिळून हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, “वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ असं म्हणतात कुठल्याही कार्याची सुरूवात बाप्पाच्या नावाने करतात. त्यात बाप्पाच्या आगमनाचा दिवस असेल याहून मंगल दिवस नाही. गेले काही दिवस एकच प्रश्न विचारला जातोय, आता पुढे काय? तर यापुढे पुणेकरांच्या ह्रदयात थोडी जागा निर्माण करायचं ठरवलय! मी आणि माझा भाऊ घेऊन येतोय ‘वदनी कवळ’ परिपूर्ण थाळीचा आस्वाद.”
तसेच तिने पुढे लिहिले की, “’शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण. इन हार्ट ऑफ पुणे, डेक्कन. लवकरच येतय तुमच्या भेटीला. खूप धाडस करुन हे पाऊल उचलते आहे. अभिनेत्री म्हणून खूप प्रेम मिळालं आता उद्योजिका म्हणून तुमच्या सहकार्याची, प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे.”
अनघाच्या या हॉटेल व्यवसायाला मराठी सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिच्या हॉटेलच्या इंटिरियरच काम सुरू असून अनघाने स्वतः पुढाकार घेऊन रंगकाम केल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.