मराठी असो वा हिंदी सध्या सर्वच टेलिव्हिजनवरील चॅनेलवर रिॲलिटी शोची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. तर कलर्स मराठीवरील ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर लगेच त्या जागी नवीन कार्यक्रमाची घोषणा झाली आहे.
शब्दांची गुंफण, सुरांची जुगलबंदी आणि वादकांचे कमाल टॅलेंट या सगळ्याला तरुणांच्या आवाजाची जोड मिळणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘सूर नवा ध्यास नवा.’ यापूर्वी या कार्यक्रमाचे एकूण पाच पर्व रसिक प्रेक्षकांचे मन जिंकत प्रचंड गाजलेत. तर यंदाचं हे सहावे पर्व असून, ‘जुनं ते सोनं असतं; पण नवंही हवं असतं’ या कल्पनेखाली पार पडणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही प्रचंड खुश आहेत.
‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या सहाव्या पर्वाचे परीक्षण ‘अवधुत गुप्ते आणि महेश काळे’ करणार आहेत. यापूर्वी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेत्री स्पृहा जोशीकडे होती. पण यावेळी मात्र ती या पर्वाचे सूत्रसंचालन करणार नाही. तर तिच्या ऐवजी माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया म्हणजेच अभिनेत्री ‘रसिका सुनील’ करणार आहे. रसिकाचे संगीतासोबत खूप जवळचे नाते. त्यामुळे संगीताचे शिक्षण घेत ती तिची आवड जोपासत आहे. तर या कार्यक्रमातून पहिल्यांदाच सूत्रसंचालक म्हणून रसिकाला पाहण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळाली आहे.
सूर नवा ध्यास नवापासून सुरू होणाऱ्या तिच्या नवीन प्रवासाबद्दल रसिका म्हणाली की, रिॲलिटी शोचं सूत्रसंचालन करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. संगीत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे संगीतविषयक सूत्रसंचालन करायला मिळतंय याचा आनंद आहे. सूर नवा ध्यास नवाच्या नव्या पर्वात तरुणाईचा आवाज ऐकायला मिळणार आहे. या पर्वात जुनी गाणी सादर होणारच आहेत. पण काही जुनी गाणी नव्या ढंगात, नव्या रुपात गायली जाणार आहेत.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचा संगीतविश्वात विशिष्ट असा दर्जा आहे. माझं आणि संगीताचं जवळचं नातं असल्यामुळे गाण्याचं सादरीकरण, संगीत आणि परीक्षकांच्या प्रतिक्रिया याचा मलासुद्धा फायदा होणार आहे. तसंच अवधुत गुप्ते आणि महेश काळे या परीक्षकांना प्रत्यक्ष ऐकणं म्हणजे पर्वणी असणार आहे. मी या संपूर्ण प्रवासाचा आनंद घेणार आहे.”
तर स्पृहा जोशीबद्दल बोलताना रसिका म्हणाली, “यापूर्वीच्या काही पर्वांमध्ये स्पृहानं उत्तम सूत्रसंचालन केलं होतं. मी सुद्धा तिची चाहती आहे. तिच्या सूत्रसंचालनानं जसं वातावरण निर्माण व्हायचं. तसा माहोल करण्याचा माझा प्रयत्न असेल. तसंच मी खऱ्या आयुष्यात आहे तशीच सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांसमोर येण्याचा माझा प्रयत्न असेल.”
View this post on Instagram
तर स्पृहाबद्दल बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले की, “मी स्पृहाला नक्कीच मिस करेन. किंबहुना आताही मी तिला मिस करतच आहे. पण आता रसिकासारखं एक नवीन नाव आलं आहे. आतापर्यंतच स्पृहा काय बोलायची, त्याला माझी प्रतिक्रिया काय असायची किंवा माझ्या बोलण्यावर स्पृहाचं उत्तर काय असेल हे ठसलेलं होतं. पण आता तसं नाहीये. आता रसिकाबरोबर नवीन बॉण्डिंग होईल, ती कशी प्रतिक्रिया देईल, कसं सूत्रसंचालन करेल, त्याला आम्ही कशा प्रतिक्रिया देऊ यातून काहीतरी नाविन्य घडेल याची मला खात्री आहे.”
तसेच यावेळी कोणते तगडे नवोदित कलाकार या कार्यक्रमात असणार याकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. तर या कार्यक्रमात यंदा जुन्या गण्यांचं मॉर्डन फ्युजन पाहण्यासाठी या शोच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.