‘नागराज मंजुळे’ हे मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत नावाजलेले दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचे नाव घेतले की, डोळ्यासमोर त्यांचे अनेक गाजलेले चित्रपट येतात. त्यापैकी २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाळ’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घातली होती.
आई व मुलाच्या नात्यातील अत्यंत साधी गोष्ट या चित्रपटात दाखवली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची प्रेक्षकांसोबत नाळ जोडली गेली आहे. तर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेला ‘नाळ’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘नागराज मंजुळे व सुधाकर रेड्डी यक्कंटी’ यांनी केले आहे.
नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाला आहे. यावरून लालापरीच्या संगतीने आपल्या आईच्या शोधात निघालेल्या चैत्याचा प्रवास कसा पूर्ण होणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. तसेच या सिनेमात कोणकोणते कलाकार कोणकोणत्या भूमिका साकारताना दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
चित्रपटाविषयी दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंटी म्हणाले की, “माझ्या पहिल्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आई मुलाच्या नात्यातील खूप साधी अशी ही गोष्ट होती. आता हीच गोष्ट पुढे जाणार आहे. ‘नाळ २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, अशी आशा आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव खूपच अनोखा होता आणि आताही आहे. नागराज मंजुळे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता या सगळ्याच भूमिकेत अव्वल आहेत. झी स्टुडिओजबद्दल सांगायचे तर त्यांनी आजपर्यंत मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या दोघांबरोबर आता माझीही नाळ जोडली गेली आहे. चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले आहे आणि चैत्या त्याच्या खऱ्या आईकडे निघाला आहे, आता त्याचा हा प्रवास त्याला कुठे नेणार, याचे उत्तर लवकरच चित्रपटगृहात मिळणार आहे.”
येत्या दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी ‘नाळ २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी अधिकच धमाकेदार असणार यात काही शंका नाही.