महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शोमधील हास्य महारथी विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) यांनी केवळ अभिनयाच्या जोरावर प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला. फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा यांसारख्या अनेक कार्यक्रमांतून त्यांनी आपल्या विनोदी अभिनयाची बाजू प्रेक्षकांसमोर ठेवली. तसेच त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केले, तर आता सध्या त्या ‘शुभविवाह’ या मालिकेत रागिणी हे पात्र साकारत आहेत. यावेळी त्या कोणत्याही विनोदी भूमिकेत नसून त्या एका खलनायिकेच्या भूमिकेत आहेत.
विशाखा यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्या त्यांचं घर सांभाळणाऱ्या ताईंसोबत आहेत. विशाखा यांनी ही पोस्ट खास या ताईंसाठी केली. विशाखा यांचे घर सांभाळणाऱ्या शोभा ताई यांनी नुकतंच त्यांच्या हक्काचं २ बीएचके घर बुक केलं. त्याबद्दल त्यांचं कौतुक करीत विशाखा यांनी ही पोस्ट शेअर केली.
त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “आज सकाळी माझ्या अंबरनाथ घर सांभाळणारी माझी अन्नपूर्णा “शोभा” तिचा फोन आला. ताई गुड न्यूज आहे, (मला वाटलं पोराच्या लग्नाची तारीख काढली असावी..!) मी म्हटलं “काय गं??” तर म्हणली ताई… घर बुक केलं २ bhk.. खूप आनंद, उत्साहात सांगत होती… मलाही खूप आनंद झाला… अंबरनाथ वेस्टला थोडं स्लम एरियामध्ये राहणारी. चौदा वर्षांपूर्वी शोभा माझ्याकडे जवळ जवळ रोज ४० मिनिट चालत कामाला यायची, तिची धावपळ आणि पोरांची काळजी म्हणून तिला माझ्या घराजवळ मी भाडयाने घर घेऊन दिलं, तर वाचलेल्या वेळेत तीने अजून एका ठिकाणी काम धरलं, पोरं मोठी झाली, शिक्षित झाली…”
तसेच त्यांचा पुढील प्रवास सांगताना विशाखा सुभेदार यांनी लिहिले की, “एकदा फ्रीज घ्यायचा होता तेव्हा म्हणाली पगारातून एक हजार कापा, तुम्ही घेऊन द्या फ्रिज.. आणि तिने फेडले पैसे.. धाडसी बाई..! तिच्या मुलांनीसुद्धा खुप कष्ट केले…१०/१२ वी नंतर कुठे-कुठे छोटयामोठ्या नोकऱ्या केल्या, घराला हातभार लावला, मग मोठा मुलगा उत्तम पगाराने कामाला लागला.. पुन्हा शोभाचा फोन.. ताई शुभमला इतक्याइतक्या पगाराची नोकरी लागली…! पुन्हा फोन ताई लग्न ठरलं…! पुन्हा फोन.. धाकटी पोर पास झाली..! तिची तिची अनेक शिखर तीने ओलांडली. आज तिचा प्रवास पहिला की मलाच खूप समाधान मिळतं.! तिच्या सगळ्या प्रवासाची मी साथीदार व साक्षीदार आहे..! माझ्याकडे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या माणसांची प्रगती झाली की कोड-कौतुक वाटतं मला…! मग ती हेअर ड्रेसर असो किंवा स्पॉटबॉय असो किंवा ड्राइव्हर..!”
विशाखा यांनी आणखी एक घटना सांगितली तेव्हा त्या म्हणल्या की, “माझ्याकडे स्पॉटबॉय म्हणून असलेला ‘शिवा’ त्याला मी क्लासला लावले, ड्रायविंग शिकवलं आणि त्याचा ड्राइव्हर झाल्यावर, त्याला उत्तम पगाराची नोकरीसुद्धा लागली.. अर्थात त्याचे कष्ट आहेतच, पण मी फक्त एक मार्ग झाले ह्याचा मला आंनद होतो कायमच..! परमेश्वरानं एक खारीचा वाटा त्यांच्या यशात मला उचलायला सांगितला, माझ्याकडून ते करवून घेतलं हे त्या ईश्वराचे आभार..माझ्या शोभाचे खूप कौतुक.”
विशाखा यांची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून सारेजण या दोघींचेही कौतुक करीत आहेत.