दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी समांथा रुथ प्रभू. समांथा ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते.‘द फॅमिली मॅन 2’ मधील भूमिका आणि अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटातील गाण्यानंतर ती अजूनच जास्त लोकप्रिय झाली. समांथा ‘यशोदा’, ‘शाकुंतलम’ आणि ‘कुशी’ या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
परंतू आता तिच्या आजाराची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपासून समांथा एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. समांथाने नुकताच एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या माहितीनुसार तिला मायोसायटिस हा आजार झाला आहे. मायोसायटिसमुळे शरीरात जेव्हा ऑटोइम्यून स्थिती निर्माण होते, तेव्हा ती शरीरातील चांगले आणि वाईट विषाणू यांच्यात फरक करू शकत नाही आणि त्यामुळेच शरीरातील हेल्दी इम्यून सिस्टमवर हा आजार आघात करतो जे खूप धोकादायक आहे.
View this post on Instagram
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “यशोदा चित्रपटाच्या ट्रेलरला तुम्ही खूप प्रेम दिलं. हेच प्रेम आणि कनेक्शन मी तुमच्या सर्वांशी शेअर करते. तुमचं सर्वांच प्रेमच मला आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याचं बळ देतं. काही महिन्यांपूर्वीच मला मायोसायटिस नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आहे. मला सुरुवातीला वाटलं होतं की हा आजार लवकरच बरा होईल आणि मी लवकर ठीक होईन, मला जास्त त्रासही होणार नाही. पण आता अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. मला हळूहळू जाणवतंय की, नेहमीच मी मजबूत आहे खंबीर आहे असं दाखवण्याची काहीच गरज नाही. ही गोष्ट स्वीकारणं एखाद्या संघर्षापेक्षा कमी नाही. डॉक्टरांना विश्वास आहे की मी लवकरच ठीक होईन. मी शारीरिक आणि मानसिकरित्या चांगल्या आणि वाईट दिवसांचा अनुभव घेत आहे. जेव्हा वाटतं की आता हे आणखी एक क्षणही सहन करू शकत नाही तेव्हा क्षण निघूनही जातो. याचा अर्थ असाच आहे की मी ठीक होण्याच्या जवळपास आहे. खूप सारं प्रेम…”
समांथा लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी सर्व तिला आधार देत आहेत तसेच तिच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी प्रार्थनाही करत आहेत.